|| विकास महाडिक

दसऱ्याच्या मुहूर्तावरील भूमीपूजन कार्यक्रमांची संख्या अर्ध्यावर:– महामुंबई क्षेत्रात दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी ४० ते ५० नवीन गृहप्रकल्पांचे भूमीपूजन केली जात होती. गेल्या वर्षी ही संख्या २४ प्रकल्पांची होती. जागतिक आर्थिक मंदी, सिडकोची महागृहनिर्मिती, निवडणूक काळ यामुळे हा शुभारंभ यंदा अध्र्यावर घसरला आहे. प्रकल्प द्रोणागिरी, पुष्पकनगर या भागाती  मोजक्याच आणि छोटय़ा प्रकल्पांना दसऱ्याला आरंभ झाला.

दसऱ्याला दिवशी ४० ते ५० विकासक हे महामुंबईच्या विविध क्षेत्रांत बांधकामाचा शुभारंभ करीत असल्याचा बिल्डर असोसिएशनच्या कार्यालयाचा अनुभव आहे, मात्र दसऱ्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दहा भूमीपूजनाचेही निमंत्रणे कार्यालयात आली नसल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या शुभारंभाच्या जाहिरतीही मोठय़ा दिमाख्यात प्रसिद्ध झाल्या असून काही मोजके विकासक वगळता अनेक विकासकांनी प्रसिद्धीसाठी हात आखडता घेतला आहे. हाती असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर विकासक भर देत असून त्यातील अनेकांनी ग्राहकांना विविध सवलतींचा वर्षांव केला आहे. तरीही ग्राहक पाठ फिरवीत असल्याचा अनुभव आहे.

गेल्या पाच वर्षांत या भागात अनेक गृहसंकुले आकारास आली असून यात २७ हजार घरे ही विक्रीविना पडून आहेत. येथील जमिनींना अधिक मोबदला दिला असल्याने ही घरे ठरवलेल्या किमतीत विकण्याचा      विकासकांचा हट्ट आजही कायम आहे. हा घर साठा पडून असतानाच मागील काही महिन्यांत देशात आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या खरेदीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. आर्थिक मंदीच्या या तडाख्यात सिडकोने नेमकी वेळ साधून थेट दोन लाख दहा हजार घरे बांधणार असल्याची घोषणा केली असून त्यातील दहा हजार घरांची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे विकासकांच्या व्यवसायाला आणखीन खीळ बसण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य ग्राहकांनी महामुंबईला पसंती दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील गृहप्रकल्पात घर घेणे सोपे आहे, पण त्या ठिकाणी नागरी सुविधांचा नावाने ठणठणाट आहे. यात रेल्वे, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याला जास्त महत्त्व दिले जात असल्याने हार्बर मार्गावरील महामुंबईला ग्राहक पसंती देत आहेत.

सिडकोने परवडणाऱ्या दोन लाख घरांची मोठी घोषणा केली आहे. त्या अगोदर पाच वर्षे विकासक या परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीत लागले होते. त्यामुळे बाजारात एकदम परवडणाऱ्या घरांचा साठा निर्माण झाला आहे. खासगी विकासकांना चढय़ा किमतीत जमिनी विकत घेऊन प्रकल्प राबवावे लागतात. त्यामुळे कवडीमोल दामाने घेतलेल्या जमिनीवर सिडकोला हे प्रकल्प राबविणे सोपे आहे.

-हरेश छेडा,  अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई</p>