आमदार मंदा म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी मुंबई : सिडकोने रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दहा एकरचा भूखंडावर कायमस्वरूपी एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याची तयारी दाखवली असून लवकरच शहरासाठी एक मोठे शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाकाळात महापालिकेची आरोग्य सुविधा कमी पडल्याने त्यांना अनेक ठिकाणी काळजी केंद्र उभारत सिडको प्रदर्शनी केंद्रात करोना रुग्णालय उभारावे लागले. यानंतर खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागल्याने शहरात मोठे शासकीय रुग्णालय व्हावे यासाठी सिडकोने भूखंड द्यावा, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी याबाबत हिरवा कंदीत दाखवला होता. शुक्रवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली असून त्यात मुखर्जी यांनीही यासाठी तयारी दाखवली आहे.

नवी मुंबई पालिकेने वाशी येथील अर्धे रुग्णालय फोर्टिस रुग्णालयाला दिले आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई शहरात उरण, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरांतूनही रुग्ण नवी मुंबईत येत आहेत. त्यामुळे शहरात सुसज्ज रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय हवे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. बेलापूर विभागातच हे रुग्णालय उभे राहणार असून याच विभागातील भूखंड प्राप्त होणार असल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी यावेळी दिली. तसेच रुग्णालय प्रत्यक्षात उभारल्यानंतर ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सिडकोकडूनच उभारणी

करोनाकाळात सिडकोने मुलुंड येथे करोना केंद्र उभारले आहे. यासाठी कोटय़वधींचा खर्च केला आहे. त्यानंतर नवी मुंबई, पनवेल व उरणमधूनही सिडकोने रुग्णालय उभारण्याची मागणी होत होती. त्यानुसार सिडकोने पनवेल व उरणसाठीही काळजी केंद्र उभारले आहे. तसेच कांजूरमार्ग येथेही मोठे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. आता नवी मुंबईतही दहा एकरवर रुग्णालय बांधून देण्याची सिडकोने तयारी दाखवली आहे.