News Flash

‘एपीएमसी’मध्ये ओळखपत्र सक्तीचे

चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय

बेकायदा व्यवयसाय, चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने लूटमार, चोरी, अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक घटकाला ओळखपत्र देण्याचे ठरविले आहे. ओळपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी बाजार समिती आहे. मात्र येथील सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतो. भाजीपाला बाजारात तसेच व्यापारी असोसिएशनच्या अंतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. मात्र या १७० एकरवर वसलेल्या बाजारात ही सुरक्षा साधने अपुरी पडत आहेत.

३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे, ४ मोठे लिलाव हॉल, ५ मोठे घाऊक मार्केट यार्ड आहेत. दररोज जवळपास ६ हजार गाडय़ा वेगवेगळ्या ठिकाणांहून बाजारात येतात. एवढय़ा मोठय़ा बाजार समितीची सुरक्षेची भिस्त केवळ काही सुरक्षारक्षकांवर आहे. या परिसरात लूटमार, चोरी, दरोडा तसेच आगीच्या घटना घडत असतात. अवैध गांजा विक्री तर एपीएमसीचा अड्डाच बनला आहे. गेल्या वर्षी मसाला बाजाराच्या आवाराबाहेर मोठय़ा गटारात एक अज्ञात मृत इसमाचा हाडांचा सांगाडा सापडला होता.

अशा घटना बाजार परिसरात वारंवार घडत आहेत. शेतकऱ्यांचा फसवणुकीचे प्रकारही होत आहेत. बाजार आवारात कोणीही व्यक्ती प्रवेश करीत असतो. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी पुढील वर्षांत ओळखपत्र दिली जाणार आहेत.

मार्चपर्यंत वाटप

कर्मचारी, व्यापारी, अडते, वाहनचालक, माथाडी, मापाडी या सर्व घटकांना टप्प्याटप्प्यात ओळखपत्र दिली जाणार आहे. बाजार आवारात ७ हजार परवानेधारक आहेत. हजारो कर्मचारी, माथाडी वर्ग आहेत. या सर्व घटकांना एपीएमसी प्रशासन एपीएमसीमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात येणार आहे. बाजार घटकाव्यतिरिक्त व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारावर नोंदणी करून प्रवेश दिला जाईल.

एपीएमसी बाजारात होणारे अनधिकृत व्यवसाय, चोरी, लूटमार इत्यादी घटकांना आळा घालण्यासाठी बाजारातील प्रत्येक घटकांना ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे बाजारात सुरक्षितता ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

-अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 3:32 am

Web Title: identity card compulsory in apmc market zws 70
Next Stories
1 पनवेल पालिकेतही बँकबदल
2 डांबरीकरण झालेला वाशी खाडीपूल अद्यापही अंधारातच
3 प्रलंबित मागण्यांवर प्रकल्पग्रस्त ठाम
Just Now!
X