पनवेल तालुक्यामध्ये ४३ मशिदी आहेत. यामधील २२ मशिदींवर लागलेले भोंगे आणि लाऊडस्पीकर विनापरवानगी अजानसाठी वापरले जात आहेत, तर ४० मशिदींना संबंधित स्वराज्य संस्थांच्या परवानग्याच मिळालेल्या नाहीत, असे पोलिसांच्या सर्वेक्षणात उजेडात आले आहे. न्यायालयाच्या धार्मिक स्थळांच्या ध्वनिप्रदूषणाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब ध्यानात आली. पोलीस विभागाने तात्काळ या बेकायदा मशिदींच्या ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मशिदींच्या ट्रस्टच्या नावाने प्रतिबंधक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

पनवेल तालुक्यामधील पनवेल शहर, तळोजा गाव आणि कळंबोली वसाहत या तीनच मशिदी परवानगी घेऊन सुरू आहेत. त्यांच्या येथे लागलेल्या भोंग्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. ही परवानगी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त अजून १९ ठिकाणी पनवेलमध्ये पारंपरिक मशिदी आहेत, मात्र त्याही विनापरवानगी सुरू आहेत. तालुक्यामध्ये मदरसा, मशिदी अशा मिळून ४३ मशिदींची संख्या पोलिसांच्या सर्वेक्षणात समोर आली आहे.