कतार ओमानचा  दुबईतून आयातीस नकार; थेट निर्यात करण्याची मागणी

हापूस आंब्याची आंतरराष्ट्रीय राजधानी मानल्या जाणाऱ्या दुबईतच यंदा हापूसवर संकट कोसळले आहे. दुबईतून हापूस आंब्याची आयात करणाऱ्या कतार ओमान या आखाती देशांनी दुबईतून आयातीस नकार दिल्याने तेथील हापूस आंब्याची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे आधीच बदलते वातावरण व रोगांमुळे संकटात सापडलेल्या हापूसपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.

कोकणातील ३० टक्के हापूस आंबा निर्यात होत असून यातील २५ ते २७ टक्के आंबा हा आखाती देशांत निर्यात होतो. कोकणातील हापूस आंबा विविध कारणांनी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि काळवंडलेले आंबे अशा स्थितीत एप्रिल महिन्यातील हापूसची आवक घटली आहे. त्यात मुंबईहून आखाती देशांत निर्यात होणाऱ्या हापूस आंब्यावर संकट आले आहे.

दुबई बंदरात निर्यात होणारा हापूस त्यानंतर विविध आखाती देशांत निर्यात केला जातो, मात्र यंदा आखाती देशांतील ओमान, मस्कत, दोहा आणि कतार या चार राज्यांनी दुबईतून हापूस आंबा आयात करण्यास नकार दिला आहे. भारताने थेट या देशांना हापूस आंबा निर्यात करावा अशी या चार देशांची मागणी आहे. त्यामुळे दुबईत जाणाऱ्या हापूस आंब्याला उठाव कमी आहे. मुंबईत बाजारातून त्याची खरेदी कमी झाली आहे. त्याचा फटका बागायतदार व व्यापाऱ्यांना बसला आहे.

या चार आखाती देशांना निर्यात करणाऱ्या दुबईतील पाच दलालांचे पैसे न मिळाल्याने त्यांनी निर्यातीतून अंग काढून घेतले आहे. दुबईतील दलालांबरोबर भारतातील निर्यातदारांचा अनेक वर्षांचा व्यापार सुरू होता. तो या बंदी मुळे ठप्प झाला आहे. व्याापाराचे पैसे मिळण्याची कोणतीच खात्री नसल्य्याने ही निर्यात कमी करण्यात आली आहे. या चार देशांना मुंबईतून हापूस आंबा निर्यात होत नसल्याने मागणी घटली आहे. त्यात दुबई सरकारने हापूस आंब्यावर पाच टक्के व्हॅट लागू केल्याने मुंबईतील व्यापाऱ्यांना निर्यात परवडेनाशी झाली आहे.

हापूस आंब्याची यंदाची परस्थिती अतिशय गंभीर आहे. निसर्गाने तर बागायतगदारांना झोडपून काढलेच आहे पण जिथे सर्वात जास्त निर्यात होते, अशा आखाती देशांतील निर्यात रोडावली आहे. तेथील चार देशांनी दुबईतून हापूस आंबा उचलण्यास नकार दिला आहे. भारतातून हापूस आंबा या देशांना पाठविल्यास त्याचे पैसे मिळण्याची कोणतीच खात्री नाही. त्यामुळे निर्यातदार दुबईत कमी आंबा पाठवू  लागले आहे.

– संजय पानसरे, माजी संचालक, एपीएमसी, तुर्भे