सिडको वाणिज्यिक व निवासी प्रयोजनासाठी भूखंड विक्री करणार * संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : जगातील सर्व दूतावास एकाच ठिकाणी कार्यरत असावेत यासाठी वांद्रे संकुलातील दूतावासाप्रमाणे नवी मुबईत ऐरोली येथे खाडीकिनारी ८० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र उभारण्याचा सिडकोचा १२ वर्षां पूर्वीचा प्रस्ताव सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे. त्या जागी आता वाणिज्यिक व निवासी भूखंड विक्री केली जाणार आहे. मुलुंड-ऐरोली खाडीपुलाजवळ असलेल्या या भूखंडला चांगली मागणी आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे सिडकोने कुर्ला येथील ‘बीकेसी’प्रमाणे नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र उभारण्याचा निर्णय २००८ मध्ये घेतला होता. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी विखुरलेले दूतावास ‘बीकेसी’मध्ये एका ठिकाणी आहेत. त्याप्रमाणे सिडकोने ऐरोली सेक्टर १० अ येथे ८० हेक्टर जागेवर ३६ देशांतील दूतावास उभारण्याचा प्रकल्प तयार केला होता. त्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून रस्ते, गटार, दिवाबत्ती यासारखा पायाभूत सुविधा उभारण्यात आला आहेत. जगभरातील देशांनी त्यांचे दूतावास उभारावेत यासाठी त्यांना प्रस्ताव देखील पाठवण्यात आले होते पण सिंगापूर मलेशिया यासारख्या आशियाई देश वगळता दुसऱ्या देशांनी यात फारसा रस दाखविला नाही. ही जागा खाडीकिनारी आहे, समुद्रकिनारी नाही. त्यामुळे अनेक गैरसोयी आहेत. विशेष म्हणजे डासांचा या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव आहे. वाहतुकीच्या दृष्टीने देखील ही जागा गैरसोयीचे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दूतावासांनी या जागेकडे पाठ फिरवली आहे.

सध्या सिडकोकडे जागा कमी आहेत. राज्यातील अनेक प्रकल्पना आर्थिक मदत करून आणि महागृहनिर्मिातच्या कंत्राटदारांना कोटय़वधी रुपये आगाऊ  रक्कम दिल्याने सिडकोच्या तिजोरीत खडखडाट होऊ  लागला आहे. सिडकोकडे असलेली रक्कम ही केवळ अनामत रक्कम स्वरूपात आहे. त्यामुळे सिडकोने सध्या भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. वाढीव चटई निदर्शकांतून कमाई करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. अशावेळी ऐरोली सेक्टर १० सारखा चांगल्या ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राच्या राखीव जागा विकण्याचा सिडको प्रशासनाने निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सिडको येथील ३४ हेक्टर जागा ही भूखंड तयार करून वाणिज्यिक व निवासी भूखंड विकणार आहे. यातून सिडको च्या तिजोरीत चांगलीच भर पडणार आहे.