सीमा भोईर, पनवेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चारपैकी दोन दाहिन्या बंद; विधी करण्याच्या जागेत लाकडे

कळंबोलीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका आणि सिडको मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी करत आहेत.

कळंबोलीत सेक्टर १२ येथे स्मशानभूमी आहे. तेथील समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी २०११-१२ पासून करण्यात येत आहे. मे २०१६मध्ये येथे चार शवदाहिन्यांची सोय करण्यात आली. त्यातील दोन दाहिन्यांची दुरवस्था झाल्यामुळे आता त्या वापरायोग्य राहिलेल्या नाहीत. येथे कधी वीजपुरवठा तर कधी पाणीपुरवठा खंडित झालेला असतो. लाकडे ठेवण्यासाठीही जागा नाही. विधी करण्याच्या जागेवर लाकडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उभे राहाण्यासाठीही जागा राहिलेली नाही.

सिडकोचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व आराखडा या सर्व विभागांची मंजुरी मिळाली की काम केले जाते. अधीक्षक अभियंत्यांनी या कामांना सध्या स्थगिती दिली आहे. तसेच कामे महानगरपालिका करेल असे सांगत हात वर केले आहेत. महापालिकेचे अधिकारी मात्र ही सिडकोचीच जबाबदारी आहे, असा दावा करत आहेत.

२०११पासून परिसरातील रहिवासी स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी पाठपुरावा करत आहेत. २०१३ ला सिडकोचे अभियंता सुहास कांबळे व कुंदन घरत यांनी प्रतीक्षागृह इमारतीपासून ते गॅस दाहिनीपर्यंत आवश्यक त्या सर्व सुविधांवरील खर्चाचे अंदाजपत्रक असलेला प्रस्ताव तयार केला होता, मात्र त्याची पुढे काहीच अंमलबजावणी झाली नाही. गेल्या सात वर्षांत ही समस्या सोडवण्यात आलेली नाही.

सुरक्षारक्षक नसल्यामुळे विजेची उपकरणे, स्वच्छतागृहे यांची मोडतोड करण्यात आली आहे. बाल दफनभूमीची अवस्थाही दयनीय आहे. स्वच्छतेचा अभाव आहे.

बाल दफनभूमीत नेहमीच जंगल वाढलेले असते. शेडच्या मागील भागात सरपटणारे प्राणी आणि अन्य दंश करणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. ही स्मशान कमी आणि जंगल जास्त वाटते. सिडको ही जागा आता पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात देणार आहे, असे रोडपालीतील रहिवासी योगेश पगडे, यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सेवांचे हस्तांतर झालेले नाही. बांधकामविषयक बाबी अजूनही सिडकोच्या अखत्यारीत आहेत.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल पालिका

कळंबोली व परिसरात ५-६ लाख लोकवस्ती आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी केवळ एकच स्मशानभूमी आहे. त्यातील चारपैकी दोन शवदाहिन्या निरुपयोगी झाल्या आहेत. त्यामुळे शवदाहिनीसाठी रांग लावावी लागते.

-आत्माराम गोविंद कदम, रहिवासी

एकूण चार शवदाहिन्या असून त्यापैकी दोन चांगल्या स्थितीत आहेत उर्वरित दोन दाहिन्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल

– गिरीश रघुवंशी, कार्यकरी अभियंता, सिडको

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalamboli cemetery deterioration
First published on: 16-08-2018 at 02:29 IST