पुनर्बाधणीची रहिवाशांची मागणी

कळंबोली शहरातील महत्त्वाच्या प्रभागांपैकी एक प्रभाग म्हणजे प्रभाग ८. मोडकळीस आलेल्या इमारती ही प्रभाग क्रमांक ८मधील सर्वात गंभीर समस्या आहे. येथील शासकीय वसाहतींची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांची पुनर्बाधणी करण्यात यावी, अशी तेथील रहिवाशांची मागणी आहे.

कळंबोली शहराची निर्मिती १९७८ ते १९८३ दरम्यान झाली. त्यादरम्यानच के. एल. ४ , के. एल. २ , के. एल. १ या अल्प गटातील घरांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी जवळपास तीन ते सडेतीन हजार बैठी घरे आहेत. मात्र त्यापैकी बहुतेक घरे मोडकळीस आली आहेत. हा परिसर समुद्र सपाटीच्या तुलनेत सखल असल्यामुळे इथे पावसाळ्यात पाणी तुंबते. घरात पाणी शिरण्याचे प्रकारदेखील होतात. त्यामुळे येथील घरांची पुनर्बाधणी करण्यात यावी आणि ही घरे उंचावर बांधावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

या वसाहतींमधील २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. त्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा व सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांडपाणी रस्त्यावर वाहण्याचे प्रकार सर्रास घडतात. शहराची विकासाची जबाबदारी घेतलेल्या सिडकोने विकासकामांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

या परिसरात महागडय़ा शैक्षणिक संस्था आहेत. मात्र या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी एकही शाळा नाही. कचऱ्याचा व पाण्याचा प्रश्न आहे. अनियमित वीजपुरवठा ही मोठी समस्या आहे. या प्रभागात असलेली सिडकोची उद्याने ही पांढरा हत्ती ठरली आहेत. उद्यानात लहान मुलांना खेळण्याची सोय नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा  केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जाते, मात्र वाचनालय आणि विरंगुळा केंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

शासकीय वसाहती सांडपाण्याच्या दलदलीत

कळंबोलीतील राज्य शासकीय वसाहतीत हजारो घरे आहेत. तेथील रहिवाशांना वर्षांनुवर्षे कोंडवाडय़ात राहिल्याप्रमाणे जीवन कंठावे लागत आहे. कळंबोलीतील सेक्टर ४ ई येथील शासकीय वसाहतीतील डागडुजीची कामे वर्षांनुवर्षे रखडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबली आहेत. काही ठिकाणी ती वाहू लागली आहेत. त्यामुळे या वसाहतीत सांडपाण्याची दलदल निर्माण झालेली आहे. आरोग्याची समस्या उद्भवत आहे.

प्रभाग क्षेत्र –

एमजीएम रुग्णालय ते शासकीय वसाहत, कळंबोली से. ४, से ४ इ, से.५, से.६, सुधागड शाळा, पाण्याची टाकी, सिडको नोडल कार्यालय.

महापालिका शाळा सुरू करण्याची मागणी

या परिसरात अनेक महागडय़ा शैक्षणिक संस्था आहेत, मात्र या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी एकही शाळा नाही. या प्रभागात  सेंट जोसेफ, न्यू इंग्लिश स्कूल, सुधागड या तीन शाळा आहेत. मात्र सर्वसामान्य पालकांना या शाळांची अवाजवी फी भरता भरता नाकीनऊ येत आहेत. महापालिका आल्यांनतर या ठिकाणी  सामान्य नागरिकांना आवाक्यात असेल अशी महानगरपालिकेची शाळा उभारण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.