News Flash

खांदेश्वर पोलीस ठाणे अतिरिक्त भूखंडाच्या प्रतीक्षेत

तीन वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यातून विभाजन होऊन स्वतंत्र खांदेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

तीन वर्र्षांपासून पोलिसांचा सिडको दरबारी स्मरणपत्रांचा मारा
तीन वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यातून विभाजन होऊन स्वतंत्र खांदेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. मात्र, अजूनही हे पोलीस ठाणे तात्पुरत्या दोन मजली रोहाऊसमध्ये स्थित आहे. तीन वर्षांपासून स्मरणपत्र पाठवूनही सिडको प्रशासनाकडून पोलिसांना हक्काचा भूखंड मिळालेला नाही.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच लाख लोकवस्ती आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ९२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. खांदेश्वर आणि नवीन पनवेल या दोन सिडको वसाहती आणि पंधरा गावे असा परिसर या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतो. तरीही या ठाण्यातील अटकेतील कैदी ठेवण्यासाठी खांदेश्वर पोलिसांना कामोठे पोलीस ठाण्याची कोठडी उसनी घ्यावी लागते. या पोलीस ठाण्याला सिडकोने खांदेश्वर व नवीन पनवेल वसाहतींना जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील भूखंड दिला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या इमारतीचे तात्पुरते उद्घाटन करण्यात आले. मात्र हा भूखंड २० गुंठेचा आहे. या भूखंडाशेजारील ४८ गुंठे जागा मिळावी यासाठी पोलीस प्रशासन मागील तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. सिडकोने त्यासाठी सकारात्मक दृष्टी दाखविली मात्र ही आश्वासने दिखाव्यापुरती ठरली आहे. प्रत्यक्षात करतो, देतो असे सांगणारे सिडकोचे उच्चपदस्थ अधिकारी पोलिसांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत.
पोलिसांना सिडकोने दिलेल्या पहिल्या पत्रामध्ये २० गुंठे जागेवरील भूखंड ताब्यात घेण्यासाठी ५० लाख रुपये भरा आणि भूखंड ताब्यात घेण्याचे सुचविले आहे. मात्र सिडको उर्वरित जागेसाठी किती रुपये भरायचे आहेत याबद्दल आदेश काढायला तयार नाहीत. ही फाइल नेमकी कोणाकडे अडकली याची वाच्यता करण्यास सिडको अधिकारी तयार नाहीत. सिडकोसोबत या संबंधी बोलणी व लेखी पत्रव्यवहार करता करता दोन पोलीस आयुक्त आणि एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या तरीही सामान्यांच्या या सुरक्षेच्या प्रश्नी सिडको गंभीर नाही. सिडकोने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना हक्काचा हा भूखंड तत्काळ दिल्यास या भूखंडाची सुमारे पावणेदोन कोटी रुपये किंमत मोजावी लागेल. हा भूखंड दिल्यावर बांधकाम करण्यासाठी दीड वर्षे लागणार आहे. तरी भूखंडाची मागणी सिडकोकडून लवकरात लवकर मंजूर व्हावी, अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करीत आहेत.
मी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या कामकाजाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी येथील जे. आर. थोरात यांनीही सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे. सिडकोने गुरुद्वाराशेजारी पोलीस ठाण्याला भूखंड दिला आहे. मात्र तो अपुरा पडतो. सिडकोने ६८ गुंठे जागा दिल्यास आम्हाला सहायक पोलीस आयुक्त यांचे कार्यालय, पोलिसांच्या निवासाची सोय व इतर सोयीसुविधा करता येतील.
-अमर देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 7:13 am

Web Title: khandeshwar police station waiting for additional plots
Next Stories
1 दहीहंडी उत्सव मंडळांचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
2 राजकीय पक्षांची घागर उताणी
3 नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे सहा महिन्यांत सर्वेक्षण करण्याचे आदेश
Just Now!
X