खारघरमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान भंगार दुकानात गांजा सापडल्याने खळबळ उडाली. सेक्टर १० मध्ये ही घटना घडली असून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भंगारविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

खारघर येथे पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. महापालिकेचे पथक सेक्टर १० मध्ये हाय वे ब्रेक हॉटेलजवळ झोपडीवजा भंगारच्या दुकानाजवळ आले असता, हे दुकान हटवताना टेबलाखाली असणाऱ्या पिशवीत गांजा असल्याचे अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकूर यांनी पाहिले. त्या पिशवीतून प्रत्येकी १० ग्रामच्या १२ पुड्या जप्त करण्यात आल्या. ‘आम्ही जेव्हा या दुकानावर कारवाई करण्यासाठी गेलो असता त्या दुकानात महिला व पुरुष बसले होते, आम्हाला पाहताच पुरुष तिथून निघून गेला’, असे भगवान पाटील यांनी सांगितले. अतिक्रमण पथकाबरोबर असणाऱ्या पोलfसांच्या ताफ्याने खारघर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दुकानात बसलेल्या मध्यमवयीन महिलेला ताब्यात घेतले असून तिची खारघर पोलिसांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी या गांजाची चोरून विक्री केली जात असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का? याचा देखील पोलीस तपास करणार आहेत.