विमानतळाच्या कामांमुळे दुर्लक्ष; पनवेलकरांच्या नशिबी प्रतीक्षाच

नवी मुंबई विमानतळानंतर सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम आजवर २४ टक्केच पूर्ण झाले आहे. पाणीटंचाईवर कोंढाणे धरणाचा पर्याय सिडकोने निवडला होता, मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या कामामुळे त्याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या धरणातून २४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून ८०० कोटी रुपये खर्चून पनवेलपर्यंत जलवाहिनी टाकली जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेने खालापूर येथील जलसंपदा विभागाचे अर्धवट पडलेले मोरबे धरण विकत घेऊन पाण्याच्या बाबतीत शहर स्वंयपूर्ण केले आहे. या उलट सिडकोने गेल्या ४५ वर्षांत एकही मालकी धरण बांधलेले नाही. पेण येथील हेटवणे धरणातील पाण्यासाठी जलसंपदा विभागाला दोनशे कोटी रुपये दिल्याने या धरणाचे पाणी कामोठे, द्रोणागिरी या भागाला आज कामी येत आहे. याच भागातील बाळगंगा धरणाच्या पाण्यासाठी सिडकोने १२२० कोटी रुपये दिलेले आहेत. पण हे धरण जलसिंचन घोटाळ्यात अडकले आहे. प्रारंभी केवळ ४९५ कोटी ४५ लाख रुपये खर्चाचे हे धरण बांधणीचा खर्च फुगत गेल्याने ते थेट १९७० कोटी ७६ लाखापर्यंत गेले आहे. या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

२२४ गावांचे ६० हजार हेक्टर क्षेत्रफळ असलेले नैना क्षेत्र हे मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाचे शहर होणार आहे. पनवेल तालुक्यातील २३ गावांच्या ३७ हेक्टर जमिनीवर सिडकोने पहिला पथदर्शी प्रकल्प जाहीर केला असून त्याचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र येथे मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या नागरिकरणासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही. सिडकोने भविष्यात लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था म्हणून गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी कोंकण जलसंधारण विकास महामंडळाकडून कोंढाणे धरण विकत घेतले आहे. महामंडळाने हे धरण २०११ रोजी बांधण्यास घेतले होते. त्यानंतर ते अर्धवट पडले होते.

७१ मीटर उंची

४२५ हेक्टर जमिनीवर हे धरण उभे राहणार असून ७१ मीटर उंच असणार आहे. या धरणाचे पाणीच पनवेलकरांसाठी संजीवनी असून त्याबाबत अद्याप सिडकोच्या वतीने संथ गतीने पावले उचलली जात आहेत. या संदर्भात सिडकोचे अधीक्षक अभियंता प्रशांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

वनविभाग जमीन संपादनाची गुंतागुंत

सिडकोने महामंडळाने खर्च केलेले ९९ कोटी १५ लाख रुपये अदा केले आहेत. कर्जतपासून १३ किलोमीटर लांब असलेल्या कोंढाणे गावाजवळ हे धरण असून तेथून पाणी पनवेलपर्यंत आणण्याची सिडकोची योजना आहे. दोन हजार ३९१ कोटी रुपये खर्च असलेल्या या धरणाच्या कामाला अद्याप म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. यात मातीच्या धरणावरच १५४४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. जमीन संपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, पुनस्र्थापना, मातीची तपासणी यासारखी कामे अद्याप प्राथमिक पातळीवर आहेत. या ठिकाणच्या ११८ कुटुंबांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासाठी सहा हेक्टर जमीन आणि सेवासुविधा द्याव्या लागणार आहेत. यात १२२ हेक्टर जमीन ही खासगी असून २९८ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. वन विभागाची जमीन संपादन करण्याची किचकट प्रक्रिया सुरू आहे.