News Flash

शीव-पनवेल मार्ग समस्यांच्या गर्तेत

चालकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ; भुयारी मार्ग बंद

|| पूनम धनावडे

चालकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ; भुयारी मार्ग बंद

कोटय़वधी रुपये खर्च करून शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. तेथपासून आजतागयत हा महामार्ग समस्येच्या विळख्यात सापडलेला आहे.

महामार्ग  २०१३ साली १२०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. टोलवेज या कंपनीला १७ वर्षे ५ महिने बांधा व वापरा या तत्त्वावर चालविण्यात देण्यात आलेला आहे. खारघर टोल वसुली बंद केल्याने या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या वेळेत मुंबई, नवी मुंबई, रायगड, कोकणला जोडणारा हा महामार्ग अंधारात हरवून जातो.

मार्गावरील बेलापूर ते वाशीपर्यंतचा तसेच कळंबोली, कामोठे हा विभागही अंधारात आहे. अंधार असल्याने अनेक अपघाताच्या घटनादेखील येथे घडल्या आहेत. या महामार्गावर रस्ता रुंदीकरणांतर्गत  वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरुळ, उरणफाटा, बेलापूर, खारघर येथे मोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. पथदिवे बंद असल्याने तसेच रस्त्यांवर खड्डे असल्याने या पुलांखालून जाताना वाहनचालकांना चाचपडत जावे लागते. बेलापूरकडे जाता-येताना पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेत अंधारामुळे त्या ठिकाणीही अपघात, कोंडीसारख्या समस्या उद्भवतात.  उड्डाणपूल रस्त्यालगत अधिक अंधार पसरलेला असतो असे सांगितले जाते.

दरम्यान, खारघर विभागात नुकतेच वाहतूक पोलिसांनी सतत पाठपुरावा करून पथदिवे दुरुस्ती करून घेतल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दिली आहे.

भुयारी मार्गाला डबक्याचे स्वरूप

भुयारी मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बेलापूर ते कामोठे येथील भुयारी मार्ग पडीक झालेले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो.  पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून तो वापरात आणावा, अशी मागणी कमोठेतील सिटिझन युनिट फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

महामार्गाची कामे ठेकेदारामुळे रखडली होती.  आता  हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे.  शासन मंजुरी मिळेल त्याप्रमाणे टप्प्या टप्प्याने या महामार्गावराची कामे पूर्ण करण्यात येतील.   – सतीश अलगूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:13 am

Web Title: lack of basic infrastructure services in navi mumbai
Next Stories
1 सीवूड्स स्थानकाच्या पश्चिमेस पार्किंगवर बंदी
2 पनवेलच्या समस्यांसंदर्भात राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे
3 खाडीपुलाचे काम पावसाळ्यानंतरच?
Just Now!
X