पालिका-पोलीस समन्वयाअभावी अंमलबजावणीतील गोंधळ कायम

नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवस वाढणारी करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी  ३ जुलैपासून पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीत पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी गोंधळ कायम असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

या कडकडीत टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, असे जाहीर करणाऱ्या  आदेशाला पोलिसांनी हरताळ फासला. सानपाडा येथे काही भागांत गुरुवारी सर्वच दुकांनांना टाळे ठोकण्यास त्यांनी दुकानदारांना भाग पाडले. स्थानिक प्रभाग अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्णय घेत असल्याने एकाच शहरात वेगवेगळे निर्णय घोषित होत असल्याने गोंधळ अधिक वाढत चालला आहे.

टाळेबंदीच्या नियमावलीत आणि तिच्या अंमलबजावणीत ठिकठिकाणी विरोधाभास असल्याने गोंधळ उडाला आहे. नवी मुंबईत तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारातील पाच बाजारपेठा आणि ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत या टाळेबंदीतून वागळण्यात आली आहे. त्यामुळे शहरात अर्धीअधिक वाहतूक सुरू आहे.

शहरी, ग्रामीण आणि  झोपडपट्टी भागात अत्यावश्यक सेवा आणि  दुकानांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यात दूध डेअरीसाठी पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत सवलत आहे. जीवनावश्यक वस्तूंमध्ये पदार्थ, बेकरी, किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाला यांची विक्री या टाळेबंदीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची अक्षरश झुंबड उडत आहे. यात सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेशिस्त कायम

टाळेबंदीत नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याच्या आवाहनाला नवी मुंबईतील शहरी भागात हरताळ फासला जात आहे.   गर्दीला आवर घालण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी गुरुवारी कडकडीत टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे दूध, किराणा माल, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूही मिळणार नसल्याचे चित्र आहे. टाळेबंदी लागू करताना राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे विक्रेंदीकरण करताना प्रभाग पातळीवर निर्णय घेण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रभाग अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक काही भागासाठी स्वयंघोषित निर्णय घेत असून सर्वच प्रकारच्या वस्तूंची विक्रीही बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पूर्ण टाळेबंदीचा पर्याय

गेले साडेतीन महिने सातत्याने बंदोबस्त आणि जीव मुठीत घेऊन सेवा करणारे पोलीस आता थकले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करताना पर्याय शोधत आहेत. उपनगरातील प्रमुख मार्गाची नाकाबंदी करून एकच मार्ग मोकळा ठेवून पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आवरताना नाकीनऊ येत असल्याने पोलिसांनी धारावी व वरळीप्रमाणे काही ठिकाणी पूर्णपणे टाळेबंदी लागू केली आहे.

ज्येष्ठ नागरिकाची पायपीट

बेलापूर येथील एक जेष्ठ नागरिक आपल्या दुचाकीवरून बँकेत जात असताना  पोलिसांनी च्यांची दुचाकी जप्त करून पायी जाण्यास भाग पाडले तर सानपाडा येथे रेल्वे सेवेत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नाहक त्रास दिला. पोलीस कारवाईचा सामना करणाऱ्या नागरिकांची सानपाडा पोलीस चौकीजवळ बुधवारी दुपारी गर्दी झाली होती.