शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र उरण शहरात खेळांसाठीच्या सुविधांची वानवा आहे. विकास आराखडा तयार करताना खेळाच्या मैदानासाठी भूखंड आरक्षित ठेवण्याचा विसर सिडकोला पडल्याचे दिसते. उरणमध्ये औद्योगिकीकरण व नागरीकरण झपाटय़ाने होत असताना मोकळ्या जागांची वानवा भासू लागली आहे. वारंवार मागणी करूनही क्रीडा विभाग तसेच सिडको या पायाभूत सुविधेविषयी उदासीन आहे.

प्रत्येक तालुक्यात आणि गावात क्रीडांगणाची सुविधा देण्यात येईल, अशी घोषणा क्रीडा विभागाकडून करण्यात आली आहे. तालुका व गाव तेथे क्रीडांगण अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याकरिता राज्य सरकारने कोटय़वधी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. यामध्ये उरण तालुक्याचाही समावेश आहे. उरणकरिता १० वर्षांपूर्वी १ कोटी रुपयांचा निधी आल्याचे जिल्ह्य़ाच्या क्रीडा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष उरणमध्ये येऊन जागेची पाहणीही केली होती. त्यानंतर उरण नगरपालिकेच्या लाल मैदानात धावपट्टी तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु असे कोणत्याही प्रकारचे काम उरणमध्ये आजपर्यंत झालेले नाही.

या भागाच्या विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोकडून येथील सर्व पक्षांनी मिळून सिडकोकडे मैदानाच्या जागेची मागणी केली होती. २०११ मध्ये तालुक्याच्या मैदानासाठी ५ एकर भूखंड राखीव ठेवण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केलेले होते. या भूखंडाचे काय झाले याची विचारणा केली असता सिडकोकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. तर सिडकोने संपादित केलेले भूखंड नवी मुंबई सेझकरिता देण्यात आले. या सेझ कंपनीकडून काही गावांत १० फूट उंचीच्या भिंतीचे कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या शेजारी असलेले खुले भूखंडही सध्या गावातील तरुणांना खेळण्यासाठी मोकळे नाहीत. पागोटे, डोंगरी, काळाधोंडा आदी ग्रामस्थांनी सेझ कंपनीलाच आव्हान देत कुंपणाच्या आतील भूखंड मैदान म्हणून घोषित केले आहेत. तर उरणच्या उर्वरित भागांतही शेतात किंवा एखाद्या मोकळ्या भूखंडावर तरुण खेळ खेळत आहेत. उरण शहराशेजारी असलेल्या गवत वाढलेल्या भूखंडांवर येथील होतकरू तरुण खेळाडू आपला जीव धोक्यात घालून सराव करत आहेत. या भागात अजगर आणि साप आढळण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढत्या उद्योगांमुळे उरणमधील वाहनांतही वाढ झाली आहे. याच रहदारीच्या मार्गावर धावपटू सकाळी सराव करतात. येथील महिला धावपटूने मुंबई आणि पुण्यातील मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळविले आहे. त्यातून तिला भारतीय रेल्वेमध्ये नोकरीही मिळाली आहे. अशाच प्रकारची आशा घेऊन उरणमधील अनेक खेळाडू सराव करत आहेत.

उरणमधील अनेक उद्योग सामाजिक सुरक्षा निधी देण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे, या निधीचा वापर करून उरणमध्ये सुसज्ज मैदान उभारल्यास उरणचे खेळाडूही आशियायी स्पर्धा आणि ऑलिम्पिकपर्यंत मजल मारू शकतील. केवळ कागदावर धोरणे राबवली जात असून क्रीडा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तरुण खेळाडूंना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचेही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

खेळांत प्रावीण्य मिळविणाऱ्यांचे सत्कार सोहळे होतात, मात्र सुविधा देण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंना सरावासाठी मुंबई किंवा नवी मुंबई येथील मैदान गाठावे लागते. याची दखल घेत लवकरात लवकर उरणच्या खेळाडूंची गंभीर समस्या सोडविण्याचा प्रयत्न राजकीय नेते व लोकप्रतिनिधी करतील अशी आशा उरणमधील खेळाडूंना आजही आहे.

नगरपालिका, राज्य सरकार, सिडको यांनी भानावर येत उरणमधील होतकरू खेळाडूंसाठी सुजज्ज खेळाचे मैदान तयार करावे आणि परवड थांबवावी, अशी मागणी येथील खेळाडू करत आहेत.

मैदान नसूनही यश

* उरण तालुक्यात खेळाच्या मैदानाचा अभाव असला तरी अनेक खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे. उरण जिमखाना, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या सारख्या विविध संस्था खेळाडूंना प्रोत्साहन व प्रशिक्षण देत आहेत.  त्यामुळे उरणमधील धावपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला झेंडा फडकविला आहे. जगातील विविध देशांत भरविण्यात आलेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात त्यांनी सुवर्णपदकापर्यंत मजल मारली आहे.

* प्रशांत पाटील यांनी विविध स्पर्धात पारितोषिकेजिंकली आहेत. तर पल्लवी पाटील, भार्गव ठाकूर यांसारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले आहे. संतोष परदेशी या तरुणाने गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी स्पर्धात सुवर्ण पदके पटकावली आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उरणमधील मुला-मुलींनी पदकांवर आपले नाव कोरले आहे.