जीटीआय (एपीएम)या जेएनपीटीमधील खासगी बंदरात स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात आले असून अनेक बाहेरील कामगारांची नोकर भरती सुरू केलेली आहे. हा स्थानिकांवर अन्याय असल्याने जीटीआयने तातडीने ही नोकर भरती थांबवावी अशी मागणी जेएनपीटीच्या विश्वस्तांनी जीटीआयच्या मुख्य व्यवस्थापकांकडे केली. तसे न झाल्यास बाहेरील कामगारांच्या नोकर भरती विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीतील निम्म्यापेक्षा अधिक कंटेनरची हाताळणी करणाऱ्या जीटीआय या खासगी बंदरात प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना डावलून बाहेरील कामगारांची नोकर भरती केली जात आहे, असा आक्षेप जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी घेतला आहे.
जीटीआयमधील स्थानिक कामगारांना कामावरून बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यांना पूर्ववत नोकरीत घेण्यासाठी येथील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्याकडे मागणी केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आपण नेमलेल्या एका नव्या कंपनीत ३० ते ४० कामगार बाहेरून आणण्यात आलेले आहेत.
जेएनपीटी आणि आपल्या बंदरातील कराराचा भंग आहे. आपल्या बंदरात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत घेण्याची अट असताना स्थानिकांवर कारवाई करून बाहेरून कामगार आणले जात आहेत. याचा निषेध करीत असून यासंदर्भात व्यवस्थापनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बालदी यांनी जीटीआय व्यवस्थापनाला दिला आहे. व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.