दोघा चोरटय़ांसह सराफाला अटक

एन. आर. आय. पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत चोरटय़ांना अटक केली असून नवी मुंबईतील तब्बल २६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरीचा माल विकत घेणाऱ्या सराफालाही अटक केली असून त्यांच्याकडून १३०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर बांगरे, अनंत कांबळे आणि चोरीचा माल विकत घेणारे सराफ रतन प्रकाश जैन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घरफोडीच्या एका गुन्ह्याबाबत एनआयआर पोलीस विशेष तपास करीत असताना हवालदार जगदीश पाटील यांना तांत्रिक तपासात घरफोडी करताना काही मोबाइलचे लोकेशन तेच तेच आढळून आले. सदर मोबाइलचा शोध घेतला असता ज्ञानेश्वर बांगरे याचा नंबर असल्याचे आढळून आले. त्याच्यावर पाळत ठेवली असता त्याच्या कांबळे नावाच्या साथीदाराचा पत्ता लागला. २६ फेब्रुवारीला त्यांना पनवेल व वावंजे येथे अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता, आरोपींनी चोरी केलेला माल हा कामोठे येथील सोन्याची पेढी चालवणारा रतन प्रकाश चांदमल जैन याला विकत असल्याचे समोर आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली. कामोठे येथीलच बल्लाळेश्वर पतपेढीत १०० ग्रॅम गहाण ठेवलेले सोनेही जप्त करण्यात आले.

तपासात या आरोपींनी एनआरआय पोलीस ठाणेअंतर्गत चार, सानपाडा व कोपरखैरणे पोलीस ठाणे, तळोजा व सीबीडी पोलीस ठाणेअंतर्गत प्रत्येकी एक, रबाळे पोलीस ठाणेअंतर्गत पाच, न्हावा शेवा पोलीस ठाणेअंतर्गत तीन, नेरुळ पोलीस ठाणेअंतर्गत तीन आणि खारघर पोलीस ठाणेअंतर्गत सात असे घरोफोडीचे २६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींकडून १३०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख ९० हजाराची रोकड, चांदीच्या वस्तू, महागडी घडय़ाळे व वाहन असा एकूण ४१ लाख ७८ हजार ९२८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सह.आयुक्त सुरेश मेखला यांनी दिली.

चोरीच्या पैशातून गावासाठी विंधनविहीर

आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी आरोपींचा एका पेट्रोल पंपावर अपघात झाला. त्यात त्यांची जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर ओळख व मैत्री झाली. मैत्री झाल्यावर दोघेही दिवसा घरफोडी करू लागले. महाराष्ट्रीय व्यक्तीचे घर लुटायचे नाही, वीक एण्ड व मराठी सण असेल तरीही चोरी करायची नाही, असा त्यांचा दंडक होता. कांबळेची राईस मिल असून तिचे आतून कुलूप लागल्याने किल्लीवाल्याला बोलावून कुलूप उघडले. त्या वेळी त्याच्याकडूनच कुलूप उघडण्याचे तंत्र शिकून घेतले. या चोरीच्या पैशातून कांबळे यांनी बुडालेला व्यवसाय उभा केला तर बांगरे याने घर घेतले. बांगरेच्या मूळ गावी दुष्काळ असल्याने त्याने गवकऱ्यांसाठी अडीच लाख रुपये खर्च करून एक विंधनविहीरही खोदून दिली होती.