‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये जाणून घेण्याची संधी

नवी मुंबई सातत्याने वाढणारे इंधनदर आणि त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू व सेवांच्या दरांतही होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. हे इंधन कुठून येते आणि त्याचे आपल्या आयुष्यातील त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्याची संधी गुरुवारी ‘लोकसत्ता विश्लेषण’ या कार्यक्रमात मिळणार आहे. वाशीतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या संदर्भातील विविध पैलूंची उकल करणार आहेत. कार्यक्रमासाठी ‘एनकेजीएसबी बँक लि.’ प्रायोजक आहे.

काळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिज तेलाचे पेट्रोल, डिझेल, नाफ्ता अशा विविध प्रकारांत रूपांतर कसे केले जाते, या उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या देशांचे जागतिक पटलावरील महत्त्व किती आहे, जगाच्या अर्थव्यस्थेवर त्यांचा एवढा प्रभाव का आहे, सामान्य माणसाच्या मासिक खर्चाशी त्याचा संबंध काय? इत्यादी अनेक मुद्दय़ांचे विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. खनिज तेलांच्या साठय़ांना काही तरी मर्यादा असतीलच, त्या ओलांडल्यानंतर पुढे काय, किती काळ यावर अवलंबून राहता येणार याचा वेधही या वेळी घेण्यात येईल.

खनिज तेल, त्याचा पुरवठा करणारे देश, त्यावर आधारित अर्थिक गणिते इत्यादी संदर्भात पडत असलेले प्रश्न विचारण्याची संधीही कार्यक्रमात श्रोत्यांना मिळणार आहे. कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

कुठे?

मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर- ६, वाशी, नवी मुंबई</p>

कधी?

गुरुवार, ९ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता