बेलापूरमधील सिडकोच्या अर्बन हाटमध्ये मकर संक्रांत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये भारतातील कलात्मक व दर्जेदार हस्तकला उत्पादने येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सिडको अर्बन हाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा मेळा १७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
मकर संक्रांतीनिमित्त महिलांना लागणाऱ्या वाणासाठी विविध वस्तू उपलब्ध असून राज्यातील हस्तकलाकारांनीही आपली विविध उत्पादने प्रदर्शनात मांडली आहेत. बचत गटांनाही मेळ्यात सहभागी करून घेतले आहे.
या कलाकारांनी अतिशय मेहनतीने तयार केलेली टेराकोटा, चर्मोद्योग, ज्यूट व बांबूची उत्पादने, वॉल हॅंगिंग, कृत्रिम दागिने, चित्रे, बांगडय़ा, कारपेट्स, पुतळे, आदी विविध वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. बनारसी, कांता, बदहानी, खादी सिल्क आदी विविध प्रकारच्या साडय़ा महिलांना आकर्षित करत आहेत. लाकडाच्या कलाकृतीमध्ये सारंगपूर येथील लाकडी फर्निचर, आंध्र प्रदेशातील लाकडी कोरीव कामे, छत्तीसगड येथील धोकरा व लोखंडी वस्तू, अरुणाचल प्रदेशातील पाम लीवची उत्पादने तसेच आंध्रामधील मोती इतक्या विविध प्रकारच्या वस्तू येथे एकाच ठिकाणी ग्राहकांना पाहायला मिळत आहे. अर्बन हाटमध्ये हळदी-कुंकूनिमित्त महिलांना देण्यात येणारे वाण येथे उपलब्ध आहेत व ते हस्तकलेच्या माध्यमातून बनवण्यात आल्याने ते महिलांना आकर्षित करत असल्याचे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या स्नेहल रोडे यांनी सांगितले.