केरळ, तामिळनाडू राज्यांतून होणारी आवक उशिराने

देशातील बदलत्या ऋतुचक्राचा सर्वाधिक परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर जाणवू लागला असून जानेवारीच्या सुरुवातीस बाजारात येणारा हापूस आंबा आता उशिराने येणार आहे. दक्षिण भारताच्या केरळ, तमिळनाडू या राज्यांतून येणारा हापूस यंदा लांबणीवर पडला आहे. कोकणात अद्याप थंडीने जोर धरला नसल्याने हापूस आंब्याची फळधारणा लांबणीवर पडली आहे.

परतीच्या पावसाने यंदा जास्त काळ मुक्काम ठोकल्याने कोकणात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत येणारा मोहर अद्याप पुरेसा आलेला नाही. त्यामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हीच स्थिती केरळ, गुजरात, कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांतील हापूस आंब्यांची आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात जानेवारीअखेर येणारा हापूस आंबा हा यंदा मार्च महिन्यात येण्याची शक्यता व्यापारीवर्ग व्यक्त करीत आहे. कोकणात अवेळी हापूस आंब्याचे उत्पादन घेण्याची स्पर्धा गेली अनेक वर्षे वाढीस लागली आहे, मात्र यंदा निर्सगानेच आपले ऋतुचक्र बदलल्याने हा हापूस आंबा उशिराने बाजारात येणार आहे. कोकणातील हापूस आंब्याबरोबर अलीकडे गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांतील हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात मुंबईत येत असून कर्नाटकी हापूस आंब्याने तर कोकणातील हापूस आंब्याला स्पर्धा निर्माण केली आहे, मात्र हा हापूस आंबादेखील यंदा बाजारात उशिराने येत आहे. हापूस आंब्याच्या लागवडीला आवश्यक असलेला पूरक थंडी अद्याप कोकणात पडलेली नाही. त्यामुळे काही बागायतींचा अपवादवगळता मोहोरधारणा झालेली नाही. ही मोहोरधारणा उशिराने होत असल्याने फळधारणादेखील उशिराने होणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याची आवक यंदा उशिराने होत आहे, पण याच वेळी शेजारील गुजरात, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात येणारा हापूस आंबादेखील उशिराने घाऊक बाजारात येत आहे. – संजय पानसरे, हापूस आंबा व्यापारी, एपीएमसी, नवी मुंबई</strong>