रेल्वेच्या ई पाससाठी आज धरणे आंदोलन; करोनामुळे १५ माथाडी कामगारांचा बळी
नवी मुंबई : करोना साथरोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात पहिल्या दिवसापासून अत्यावश्यक सेवा म्हणून एपीएमसी बाजारात करोनायोद्धय़ासारखे काम करणाऱ्या माथाडी कामगार, सुरक्षारक्षक आणि इतर संबंधित घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून घ्या, असा इशारा माथाडी कामगार संघटनेने राज्य सरकारला दिला आहे. माथाडी कामगारांना रेल्वेचे ई पास मिळावेत यासाठी बुधवारी या संघटनेचे काही पदाधिकारी सामाजिक अंतर राखून वाशी रेल्वे स्टेशनसमोर प्रातिनिधिक धरणे आंदोलन करणार आहेत.
राज्य सरकारने टाळेबंदीत तुर्भे येथील पाच घाऊक बाजारपेठा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. घाऊक बाजारपेठेतील दुकाने सुरू न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाइलाजास्तव दुकाने सुरू ठेवावी लागली आहेत. या पाचही बाजारपेठेत कष्टकरी काम करणारे माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला, सुरक्षारक्षक यांना अत्यावश्यक सेवेकरी म्हणून टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून कामावर यावे लागत आहे. या सर्व लढाईत पोलीस, डॉक्टर, नर्स आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यात माथाडी कामगारही आघाडीवर आहेत.
टाळेबंदीच्या पाचव्या सत्रात केंद्र व राज्य सरकारने काही अत्यावश्यक सेवेतील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. औषध, तेल, कोळसा, गॅस, खते आणि वैद्यकीय साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत चढउतार करण्याचे काम माथाडी कामगार करीत असल्याने त्यांनाही कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईत रेल्वेने येणाऱ्या कच्चा माल तसेच जेएनपीटी व बीपीटीत माथाडी कामगारांची आजही नितांत गरज आहे. अत्यावश्यक सेवेतील या सेवेकरांना राज्य सरकारने अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने गेली दीड महिन्यांपासून प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देण्यात आली आहे.
कामगारांची पोलिसांकडून अडवणूक
अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना रेल्वे साधा ई पास देत नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील शेवटच्या उपनगरात राहणाऱ्या ह्य़ा सत्तर हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रेल्वे क्यूआर कोड ई पास देत नसल्याने या कर्मचाऱ्यांना रस्त्यात पोलिसांचे दांडुके खाण्याची वेळ आल्याचे या संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. एपीएमसी बाजारात सात व इतर ठिकाणी आठ असे पंधरा माथाडी कामगारांचे या साथरोगात बळी गेले आहेत. तरीही सरकार या कामगारांना कोविडयोद्धा म्हणून अत्यावश्यक सेवेत समावेश करीत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जीव धोक्यात घालून करोना प्रादुर्भावाच्या पहिल्या दिवसापासून जनतेची सेवा करणाऱ्या माथाडी कामगारांना सरकार साधे विमा कवच देत नाही. दीड महिन्यांपासून यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे; पण सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नाइलाजास्तव बुधवारी धरणे धरावे लागणार आहे. वेळप्रसंगी काम बंद आंदोलनही हाती घ्यावे लागेल.
– नरेंद्र पाटील, माथाडी नेते