एमआयडीसीची निम्मा खर्च उचलण्याची तयारी; चार किमी मार्गाचे काम पुढील आर्थिक वर्षांपासून

वाढत्या नागरीकरणाबरोबरच महामुंबई क्षेत्रातील औद्योगिकीकरण वाढण्यास पूरक ठरणारी नवी मुंबई मेट्रो पुढे तळोजा एमआयडीसीपर्यंत नेण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रातून जाणाऱ्या दोन किमी मार्गासाठी येणाऱ्या खर्चाचा अर्धा वाटा उचलण्याची तयारी एमआयडीसीने दाखविली आहे. या विस्तारित मेट्रो मार्गावर १३८० कोटी रुपये खर्च येणार आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. सिडकोने या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंदार या मार्गावरील व्हायडक्ट आणि स्टेशन यांची ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण केलेली आहेत. ही मेट्रो वर्षभरात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण दक्षिण नवी मुंबईत मेट्रोचे जाळे विणताना सिडकोने बेलापूर पेंदार (११. १० किलोमीटर एकूण खर्च ३०६३ कोटी), खांदेश्वर ते तळोजा (७.१२ किलोमीटर एकूण खर्च २५२८ कोटी), पेंदार ते तळोजा (३.८७ किलोमीटर, एकूण खर्च १३८० कोटी) आणि खांदेश्वर ते प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (४.१७ किलोमीटर, एकूण खर्च १४८० कोटी) अशा एकूण २६ किलोमीटर साठी ८८८७ कोटी रुपये खर्चाच्या चार प्रकल्पांचा विकास आराखडा तयार केलेला आहे. नैना प्रकल्पामुळे महामुंबई (पनवेल, उरण, खोपोली, खालापूर) या क्षेत्रातील नागरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. याच वेळी येथील तळोजा, रसायनी, एमआयडीसीत उद्योगधंद्याच्या अनेक संधी प्राप्त होणार असून रोजगारही वाढणार आहे.

यामुळे औद्योगिकीकरणाला चालना देणारी मेट्रो पेंदारच्या पुढे तळोजा एमआयडीसीपर्यंत नेल्यास कामगार तसेच उद्योजकांना सार्वजनिक परिवहन उपलब्ध होणार आहे. या हेतूने एमआयडीसी आणि सिडको यांच्या झालेल्या बैठकीत बेलापूर पेंदार प्रकल्पाबरोबरच पावनेचार किलोमीटर मेट्रोचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पुढील आर्थिक वर्षांनंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीने या भागीदारी प्रकल्पाला मान्यता दिली असून हा राज्यातील दोन महामंडळांनी हाती घेतलेला पहिला संयुक्त प्रकल्प आहे. एमआयडीसीच्या क्षेत्रातून दोन किलोमीटरचा मेट्रो मार्ग जाणार असल्याने त्याचा अर्धा खर्च एमआयडीसी देणार आहे. मेट्रोच्या एक किलोमीटर अंतराच्या खर्चासाठी ३२५ ते ३५५ कोटी रुपये खर्च येत असल्याने दोन किलोमीटर अंतरासाठी सातशे कोटीपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यातील ३५० कोटी रुपये एमआयडीसी देणार आहे.

सिडकोच्या बेलापूर ते पेंदार या मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. आराखडय़ानुसार खांदेश्वर ते तळोजा या दुसऱ्या टप्प्यातील सात किलोमीटर मार्गाचे काम अपेक्षित होते. पण वाढते औद्योगिकीकरण आणि एमआयडीसीच्या मागणीनुसार पेंदार ते तळोजा एमआयडीसी मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या प्रकल्पात एमआयडीसी खर्चाचा काही हिस्सा उचलणार आहे.    – भूषण गगराणी,  व्यवस्थापकीय संचालक, सिडको