दुरुस्तीसाठी दोन वर्षांत २३५ कोटी रुपये खर्चाची तरतूद

एमआयडीसीतील उद्योजकांकडून कोटय़वधी रुपयांचा कर वसूल करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने अंतर्गत रस्त्यांची पुनर्बाधणी करण्याच्या मुद्दय़ावर हात वर केल्यानंतर एमआयडीसीने रबाळे, महापे आणि तुर्भे येथील खड्डेमय अंतर्गत रस्त्यांची पुनर्बाधणी, पावसाळी नाले, गटार आणि पदपथ यांच्या २३५ कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी सुरुवात केली. त्यामुळे गेली अनेक वर्षे अंत्यत दयनीय अवस्थेत असलेले हे रस्ते चकाचक होणार असून उद्योजक आणि कामगारांचा १४ वर्षांचा वनवास संपणार आहे.

नवी मुंबई पालिका आणि लघु उद्योजक संघटना यांचा गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. एमआयडीसी हे स्वंतत्र प्राधिकरण असल्याने पालिकेला मालमत्ता आणि उपकर (आता जीएसटी) घेण्याचा अधिकार नाही, असे उद्योजक संघटनेचे म्हणणे आहे. त्या विरोधात पालिकांना त्यांच्या हद्दीतील उद्योजकांनाकडून विविध कर घेण्याचे घटनात्मक अधिकार आहे, असा दावा नवी मुंबई पालिकेने केला आहे.

हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही पालिकेला कर घेण्याचे अधिकार आहेत असा निर्वाळा दिला. या भांडणात गेली २० वर्षे एमआयडीसीतील रस्ते, पावसाळी नाले, दिवाबत्ती याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात या समस्या अधिक तीव्र होत असल्याने परदेशातून येणारे उद्योजक येथील कारखान्यांना भेट देताना नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे दोन वर्षांपासून पालिकेने या भागांतील मुख्य रस्त्यांची कामे हाती घेतली होती. ४०० कोटी रुपये खर्च करून पूर्वेकडील मुख्य रस्ते चकाचक करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून आता औद्योगिक वाहतूक वळवण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांची पुनर्बाधणी अथवा दुरुस्ती हे पालिकेचे काम नाही, असे पालिकेने या लघुउद्योजकांना चार वर्षांपूर्वी कळवले होते.एमआयडीसीचे तात्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी या रस्त्याची पाहणी करून पुनर्बाधणीस हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर एमआयडीसीने सर्वेक्षण करून महापे, रबाळे आणि तुर्भे येथील २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. यात रस्त्याच्या जवळील पदपथ, गटारे, पावसाळी नाले, जलवाहिनी, दिवाबत्ती आणि इतर वाहिन्यांसाठी डक्ट यांची तजवीज केली जाणार आहे. दोन वर्षांत ही कामे होणार असून बुधवारी रबाळे एमआयडीसीतून या कामाचा शुभारंभ झाला. या वेळी अनेक उद्योजक, एमआयडीसीचे अभियंता अविनाश माळी, संजीव सावळे, वाय. के. मेश्राम उपस्थित होते. हे काम व्हावे यासाठी स्मॉल स्केल आंत्रप्रेनर्स असोशिएशनने पाठपुरावा केला होता.रस्ते पुनर्बाधणी व विस्तारात थाटलेले अतिक्रमण तोडले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच या पुनर्बाधणीला काही उद्योजक मंजुरी देत नव्हते, अशी चर्चा आहे.

एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. परदेशातून येणारे वितरक हे रस्ते बघून नाराजी व्यक्त करतात. हे रस्ते व्हावेत यासाठी लघु उद्योजक संघटनेने दीड वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आज यश आले असून २३५ कोटी रुपये खर्चाचे रस्ते तयार होणार आहेत.

के. आर. गोपी, स्मॉल स्केल आंत्रप्रेनर्स असोशिएशन, नवी मुंबई

एमआयडीसी तीन विभागांतील रस्त्यांची पाहणी करून २१ किलोमीटर अंतराचे रस्ते दोन वर्षांत बांधणार आहे. केवळ रस्ते न बांधता पावसाळी पाण्याला निचरा व्हावा यासाठी नाले, गटारे बांधण्यात येणार आहेत. जलवाहिन्यादेखील बदलण्यात येणार आहेत. यामुळे एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते कात टाकणार आहेत.

प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, टीटीसी