कर्नाळा, लोणावळ्याजवळील जंगलातील वानरांचा फळांच्या ट्रकमधून शहराकडे मोर्चा

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई : मानवाने स्वत:चा परीघ ओलांडत मोकळ्या जागा काबीज करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू जंगले आक्रसत गेली. जंगलच उरले नसल्याने तिथल्या प्राण्यांचे अस्तित्वही काळानुसार पुसले गेले आणि काँक्रीटचे जंगल उगवले. आज या इमारतींच्या जंगलात एखादा जंगली प्राणी दिसला की लोकांना काय आश्चर्य वाटते! काही दिवसांपासून वाशीतील रहिवाशांची स्थिती अशीच काहीशी झाली आहे. वाशीतील काही भागांतील इमारतींभोवती माकडांचा गट हुडदुडय़ा मारत फिरत आहे. त्यामुळे अचानक झालेल्या ‘मर्कट दर्शना’ने अनेकांची पावले थबकत आहेत. काही जण त्यांना मोबाइलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात दंग झाले आहेत.

वाशीसारख्या गजबजलेल्या परिसरात याआधी कधीही माकडांचे दर्शन नागरिकांना झालेले नव्हते. परंतु गेल्या मार्चपासून देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वत्र शांतता आहे. रोज होणारी माणसांची गर्दी, वाहनांची वर्दळ नवी मुंबईत नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीत कमी झाली आहे. त्यामुळे माकडांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे. वाशी सेक्टर-२८ आणि २९ मध्ये या माकडे गटागटाने फिरत आहेत. अर्थात, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात येणाऱ्या फळांच्या वाहनांचा आश्रय घेत ही माकडे वाशीत दाखल होत असल्याची माहिती प्राणिमित्रांनी दिली. नवी मुंबईच्या पूर्वेला एमआयडीसीलगतच जंगल आहे. येथून ही माकडे मानवी वस्तीत येत असल्याची माहिती प्राणिमित्रांनी दिली.

मानवी वस्तीतच वावर

‘एपीएमसी’तील फळ बाजारात ट्रक येत असतात. या वाहनांचा आश्रय घेत ही माकडे शहरात येतात. ही माकडे कर्नाळा वा लोणावळाजवळील घाटातून प्रवास करताना ट्रकवर चढतात आणि शहरात जिथे खाण्यास काही मिळाल्यास तिथे उतरतात. माकडे साधारण गटाने शहरात येतात. वाशीत सध्या दिसणारी माकडे तशीच आली आहेत. खरे तर माकडांचे शहरातही वास्तव्य असते. मात्र नेहमीच्या वर्दळीत त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. खाण्याच्या शोधात ती मानवी वस्तीत येतात, अशी माहिती प्राणिमित्र, पुनर्वसु फाऊंडेशनचे संस्थापक प्रीतम भुसाणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.