सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत ६० टक्के बाधित

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : मुंबईनंतर सर्वाधिक खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची संख्या असलेल्या नवी मुंबईत सद्य:स्थितीत मुंबईतील साठ टक्के करोना रुग्ण उपचार घेत असल्याने नवी मुंबईतील करोना रुग्णांना खाटा मिळेनाशा झाल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांत आता खाटा उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील रुग्ण नवी मुंबई, ठाण्यात उपचारार्थ दाखल होत आहेत. या रुग्णामुळे का होईना भरमसाट बिलांनी खासगी रुग्णालयांची तिजोरी भरत असल्याने या रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेतले जात आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल या मोठय़ा शहरांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची संख्या नवी मुंबईइतकी नाही. सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण व्हावेत यासाठी सिडकोने काही संस्था व समूहांना सवलतीच्या दरात भूखंड दिलेले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना लागणारी ‘५०० खाटांचे रुग्णालय आवश्यक’ ही अट येथील शैक्षणिक संस्थांनी सिडकोचा भूखंड मिळवून पूर्ण केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत डी. वाय. पाटील, तेरणा व एम.जी.एम. ही वैद्यकीय महाविद्यालय चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची अद्ययावत अशी सुपर स्पेशालिटी रुग्णालयेदेखील आहेत.

पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील दोन लाख चौरस फुटांचे क्षेत्रफळ हिरानंदानी फोर्टिज या वैद्यकीय समूहाला वीस वर्षांपूर्वीच नाममात्र दराने आंदण दिलेले आहे. त्या संदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे.

बेलापूर येथे भाजप सरकारच्या काळात सिडकोकडून भूखंड मिळवून दक्षिणेतील अपोलो रुग्णालय समूहाने अद्ययावत पंचतारांकित असे रुग्णालय उभारले आहे, तर खैरणे एमआयडीसीत रिलायन्सने आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी स्वत:च्या जागेत अलीकडेच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले आहे.

सानपाडय़ातील महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट, वाशी येथील पीकेसी रुग्णालये अशी अनेक सुपर स्पेशालिटी रुग्णालये नवी मुंबईत कार्यरत आहेत. यातील ९३५ खाटा पालिकेच्या आदेशाने केवळ करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र या रुग्णालयातील खाटांवर मुंबईतील साठ टक्के करोना रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे नवी मुंबईतील अत्यवस्थ रुग्णांनाही खासगी रुग्णालयांचे दरवाजे बंद झाले असल्याचे चित्र आहे.

खाटांची व्यवस्था

* पालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय – १७५

* तेरणा , नेरुळ – २५०

* एमजीएम, बेलापूर – ५०

* हिरानंदानी फोर्टिज  – १००

* रिलायन्स, खैरणे – १२०

* अपोलो,बेलापूर – १००

* महात्मा चॅरिटेबल  – १००

* पी.के.सी. हॉस्पिटल वाशी – ४०

करोना रुग्णाबाबत भेदभाव करण्याचा प्रश्न येत नाही; पण नवी मुंबईतील अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयातही उपचार होणार नसतील तर त्या व्यवस्थेचा करदात्या नवी मुंबईकरांना उपयोग काय? किमान ६० टक्के खाटा या नवी मुंबईकरांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे.

– अमरजा चव्हाण, समाजसेविका, वाशी