मानसरोवर येथील तडजोडीचा करार डोकेदुखीचा
मानसरोवर रेल्वे स्थानक हे महामार्गापासून लांब असल्याने या स्थानकात उतरून वसाहतींमधील घरी पोहोचेपर्यंत प्रवाशांना बरीच कसरत करावी लागत असे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बससेवेमुळे कामोठे व कळंबोली वसाहतींमधील प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे. मात्र स्थानिक तीन आसनी रिक्षाचालक संघटना व एनएमएमटी प्रशासन यांच्या तडजोडीच्या करारामुळे बस डोळ्यांसमोर उभी असली तरीही या प्रवाशांना येथे ताटकळत थांबावे लागते. या स्थानकाबाहेर रिक्षाचालकांना झुकते माप मिळत असल्याने बसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
कायदे सामान्य प्रवाशांच्या हिताचे असतात की त्यांच्या मुळावर उठणारे हे मानसरोवर रेल्वेस्थानकातील सायंकाळच्या प्रवाशांची रांग पाहून लक्षात येते. विशेष म्हणजे हा करार मनमानी असलातरीही पोलिसांच्या मध्यस्थीनेच झाला आहे. कामोठय़ातील बस शुभारंभात विघ्न टाळण्यासाठी पोलिसांनी हा बेकायदेशीर मार्ग अवलंबून करार घडवून आणला. या बससेवेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे एनएमएमटीची तिजोरी भरली मात्र प्रवाशांना रोज सायंकाळी डासांशी दोन हात करावे लागत आहे. अस्थिर असणे म्हणजेच डासांना पळवणे हा एकमेव व्यायाम येथील प्रवासी करतात. सात रुपयांत घर गाठण्यासाठी या सामान्य प्रवाशांची ही तळमळ असते. ५६ क्रमांक ही बस कळंबोलीच्या पोलीस मुख्यालयापर्यंत जाते, मात्र ही बस दहा मिनिटांनी असल्याने प्रवाशांची प्रतीक्षेची रांग वाढलेली येथे दिसते. बस रिकामी असूनही ती थांब्यावर उभी न करता, ती दूरवर उभी केली जाते. येथील सामान्य प्रवासी एनएमएमटी बसच्या वाहक व चालकांना किमान रात्रीच्यावेळी बसच्या बाहेर डासांशी सामना करण्यापेक्षा बसमध्ये बसवण्याची विनंती करत आहेत. या परिसरात असणाऱ्या कांदळवनामुळे आणि खाडीकिनारपट्टीमुळे येथे डासांचे प्रमाण जास्त आहे. सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी या परिसरात रात्री धूर फवारणी करणार असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2015 रोजी प्रकाशित
रिक्षाचालकांना झुकते माप दिल्याने बस प्रवाशांचे हाल
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बससेवेमुळे कामोठे व कळंबोली वसाहतींमधील प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे
Written by रत्नाकर पवार

First published on: 27-11-2015 at 01:45 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipality give favor to rickshaw