आठवडय़ाची मुलाखत :  अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबईत करोना स्थिती नियंत्रणात येत आहे. करोनामुक्तीचा दर हा ९२ टक्के वर पोहोचला असून उपचार घेत असलेले रुग्ण प्रथमच तीन हजारांपेक्षा कमी झाले आहेत. असे असले तरी करोनाच्या बाबतीत समाधान व्यक्त करण्याची भीती वाटत असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मुखपट्टी हीच लस असून या रोगापासून वाचण्याचे प्रमुख अस्त्र असल्याचे सांगितले.

* करोनाबाधित रुग्णांची स्थिती काय आहे?

राज्यातच करोना बाधितांची संख्या कमी झालेली आहे. त्याला नवी मुंबई अपवाद नाही, पण करोनाच्या बाबतीत समाधान व्यक्त करण्याची भीती वाटते. युरोपमध्ये संख्या कमी झालेली असताना ती पुन्हा वाढली आहे. त्यात मृत्युदर वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे करोना कमी झाला आहे असे वाटत असतानाच तो वाढू शकतो. गणेशोत्सवात रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे गर्दी वाढली की संख्या वाढते हे एक समीकरण दिसून येत आहे. त्यामुळे आता ही भीती दसरा-दिवाळीत वाटत आहे. करोना गेला असे गृहीत धरून लोकांचा वावर सुरू झाला आहे. ही एक फार मोठी चिंतेची बाब आहे. त्यात काही जण मुखपट्टी ही केवळ नावाला घालत असून काही जण तिचा फॅशनसारखा वापर करीत आहेत. लशीचा शोध लागत नाही आणि तो लागला तरी ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मुखपट्टी हीच एक प्रकारची लस आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असताना मुखपट्टी हेच या रोगापासून वाचण्याचे प्रमुख अस्त्र आहे. यात एक सवय अंगी लावून घेतल्यास करोनाला ९० टक्के रोखता येण्यासारखे आहे. ते म्हणजे चेहऱ्याला हात लागणार नाही त्याची काळजी घेणे. पण करोनाचे सर्वाधिक ज्ञान असलेले डॉक्टर सारखा चेहऱ्यावर हात फिरवतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकाला ही सवय लागणे तसे कठीणच आहे.

*  पालिकेची सर्व तयारी झाली आहे का?

नवी मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही तयारीची शेवटची पायरी गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही तयारी केव्हाच पूर्ण होणार नाही, पण आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सध्या सर्व टीम थोडी रिलॅक्स झाली आहे, पण ती पुन्हा कामाला लागण्याची तयारी करीत आहे. वाशी येथील सिडको कोविड काळजी केंद्रात ७५ आयसीयू युनिट तयार केले जात असून ही संख्या आता पाचशेच्या वर जात आहे. याशिवाय वाशीतील कामगार आयुर्विमा रुग्णालयात १२५ अत्यवस्थ रुग्णांसाठी तयारी प्रगतिपथावर आहे. त्यामुळे करोना विषाणूसाठी लागणारी

सर्व तयारी करण्याची प्रक्रिया ही सतत चालणार आहे. विलगीकरण, ऑक्सिजन याची तर पालिकेने अतिरिक्त तयारी करून ठेवली असून सद्य:स्थितीत अनेक रुग्णशय्या खाली आहेत. प्राणवायू रुग्णशय्यांची तयारीदेखील आहे. पालिका क्षेत्रात करोना रुग्णसंख्येचा एक पिक टाइम येऊन गेला आहे. त्यामुळे आमची तयारी अधिक सक्षम होऊ शकलेली आहे. मृत्युदरदेखील कमी होऊन तो दोनवर स्थिरावला आहे. प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा केली जात असून करोना शरीराबाहेर आहे तोपर्यंत त्याला रोखणे सहज शक्य आहे. शरीरात प्रवेश केल्यावरही मृत्यू ओढवण्याची शक्यता दोन टक्के असली तरी त्यात कोणता रुग्ण असू शकेल हे सांगता येत नाही. १८ वर्षीय तरुणीलाही या आजाराने गाठलेले आहे.

*  हिवाळ्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे का?

उन्हाळा किंवा हिवाळा असे या साथरोगाबाबत काही सांगता येत नाही. ही साथ बेभरवशाची आहे. त्याबाबत ठोकताळे मांडता येत नाहीत. उन्हाळ्यात मी नागपूरमध्ये होतो. नागपूरचा उन्हाळा हा सर्वज्ञात आहे. उन्हात म्हणे हा विषाणू तग धरू शकणार नाही, पण नेमके त्या काळात नागपूरमध्ये या रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे हिवाळा हा या विषाणूसाठी पोषक आहे किंवा घातक आहे हे सांगता येणार नाही. पण प्रत्येक ऋतुकाळात जी काळजी घेणे आवश्यक आहे ती घेतली पाहिजे. ऋतू या विषाणूसाठी पोषक आहेत का ते माहीत नाही, पण गर्दी नक्कीच आहे. त्यामुळे गर्दी टाळा. अत्यावश्यक नसेल तर घरातून बाहेर  पडणे टाळा, हाच एक उपाय आहे.

*  तुमच्या टॉक विथ पेशंटया उपक्रमाला कसा प्रतिसाद आहे?

टॉक विथ पेशंट या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवडय़ातून सर्व दिवस नाही, पण किमान पाच दिवस तरी मी प्रत्येक कोविड केंद्रात संपर्क साधून रुग्णांशी थेट बोलत आहे. त्यामुळे त्या सेंटरची सद्य:स्थिती बसल्या ठिकाणी कळत आहे. एका कोविड केंद्रात शौचालये अस्वच्छ होती. रुग्णाने मला ते थेट सांगितले. मी रुग्णालय प्रशासनाशी बोललो. तेव्हा मला स्पेसिफिक कोणते शौचालय खराब आहे ते रुग्णाने दिलेल्या माहितीमुळे सांगता आले. हा संवाद चांगला होत असून प्रत्येक रुग्णालयाची माहिती मिळत आहे.

*  नॉन कोविडकामांना सुरुवात झाली का?

हो. आता ते सुरू करावेच लागणार होते. कोविडशी लढण्यास लागणारी सर्व सामग्री एकत्र केल्याने आता त्याबाबत खात्री आली आहे. पहिल्यांदा काय करावे, कुठून सुरुवात करावी, अशी स्थिती सर्वच प्रशासनांची होती. पण आता स्थिरता आली आहे. जे उभारलेय ते आता सुरुळीत कसे चालेल, याची काळजी घेतली जात आहे. त्यात अपडेट केले जात आहे. निष्णात डॉक्टरांशी संवाद कायम आहे.

त्यामुळे नॉन कोविड नागरी कामांना सुरुवात झाली असून माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागातील कामे घेऊन येत आहेत. योग्य वाटल्यास ती केली जाणार आहेत. काही मोठे प्रकल्प, जसे विज्ञान केंद्र, यांना चालना दिली जाणार आहे. दिवाळीनंतर या कामांना गती दिली जाणार असून स्वच्छ अभियानात देशात पहिले येण्यासाठी सर्वानीच कंबर कसली असून या वेळी वुई कॅन हे घोषवाक्य घेऊन आम्ही उतरलेलो आहोत.