प्राप्तिकर विभागाने मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात जाऊन पालिकेच्या व्यवहारांची चौकशी केली. हे अधिकारी मध्यरात्री २ पर्यंत पालिका मुख्यालयात तळ ठोकून होते. तब्बल १६ तास महानगरपालिकेच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सर्वात प्रथम वित्त लेखा अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत चौकशीस सुरुवात केली. दुपापर्यंत येथील चौकशी झाल्यानंतर पालिका मुख्यालयातील मालमत्ता विभागातील आर्थिक व्यवहार झालेल्या कंत्राटाच्या फायली तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर मालमत्ता, आरोग्य, नगररचना अशा प्रमुख विभागांची चौकशी करण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजेपर्यंत पालिका मुख्यालयातील विविध विभागांची चौकशी केली.

प्राप्तिकर विभागाकडून ही नियमित तपासणी होती. टीडीएससंदर्भात प्राप्तिकर विभागाला हवी असलेली माहिती त्यांनी घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकने सन २०१६-१७ मध्ये करभरणा केला आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचीही चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिकेच्या व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली.   – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका