नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत  शिवसेनेचे शिवराम पाटील यांना मतदान करून पाठिंबा देणाऱ्या मीरा पाटील या नगरसेविका आणि त्यांचे सूत्रधार सरचिटणीस माजी महापौर रमाकांत म्हात्रे व सचिव संतोष शेट्टी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीत करण्यात आली. स्थानिक काँग्रेसने या संदर्भात एक अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे पण त्याबाबत अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही.

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांना अनपेक्षित यश मिळाले. त्यासाठी काँग्रेसच्या सदस्या मीरा पाटील यांचे एक मत निर्णायक ठरले. मित्रपक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत सुतार यांना मतदान करण्याचा पक्षादेश असताना पाटील यांनी मोठय़ा हिमतीने शिवराम पाटील यांना मतदान केले. त्यामुळेच अशक्य असे सभापतिपद शिवसेनेच्या वाटय़ाला आले. शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाला मतदान करण्यात येऊ नये असे आदेश असताना पाटील यांनी उचललेले पाऊल हे त्यांचे गॉडफादर राज्याचे पक्ष सचिव संतोष शेट्टी यांच्या आदेशाने होते असे नंतर स्पष्ट झाले. या खेळीच्या मागे असलेले शेट्टी व म्हात्रे या जोडीवर कारवाई करण्यात आली आहे.

स्थायी समिती सभापती निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या मीरा पाटील या शेट्टी यांच्या वाहतूक कंपनीत यापूर्वी कामाला असल्याने शेट्टी यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे त्यांनी शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केले. अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना रमाकांत म्हात्रे यांना नवी मुंबईत गमतीने छोटे मुख्यमंत्री म्हटले जात होते. त्या काळात म्हात्रे यांच्या गोठवली येथील घरी चव्हाण यांनी दोन वेळा स्नेहभोजनासाठी भेट दिली होती. चव्हाण हे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना क्षमा करीत नाहीत, असे म्हात्रे नेहमीच सांगत आले आहेत. राष्ट्रवादीच्या पालिकेत चाललेल्या मनमानी कारभाराला दे धक्का देण्याची खेळी येथील नेतृत्वाने चव्हाण यांच्या कानावर घातली होती, अशी चर्चा आहे. त्यातूनच या युतीचा जन्म झाला असून त्याला पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पाटील, शेट्टी, म्हात्रे यांच्यावर कारवाई होण्याची सुतराम शक्यता नाही असे म्हटले जात आहे.