पायाभूत सुविद्यांमुळे नवी मुंबईला पसंती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात नवी मुंबई हे देशात राहण्यायोग्य शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकाचे शहर म्हणून जाहीर झाले आहे. यापूर्वी हे शहर तिसऱ्या क्रमांकावर होते. राज्यात पुण्यानंतर नवी मुंबई हे आधुनिक शहर राहण्यास पसंतीदायक असून देशातील १११ देशांच्या स्पर्धेत हे शहर सहाव्या क्रमांक पटकावला आहे. यामुळे नवी मुंबईतील जमीन व घरांचे दर वाढणार आहे. बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यास केंद्र सरकारची ही स्पर्धा फायदेशीर ठरणार आहे.

केंद्रीय नागरी मंत्रालयाने गेल्या वर्षी केलेल्या एका सर्वेक्षणात देशात बंगळुरु हे राहण्यास एक उत्तम शहर असून त्यानंतर राज्यातील आयटी हब पुण्याला पसंती देण्यात आली आहे. त्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद शहराला पंसती देण्यात आली असून चेन्नई, सुरत, नवी मुंबई ही शहरे आहेत.

नवी मुंबईतील रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबई देशातील इतर शहरापेक्षा सरस ठरत आहे. ५५० चौरस किलोमीटर लांबीचे अंर्तगत मार्गे ही एक जमेची बाजू असून मुंबईनंतर विद्युत पुरवठा खंडित न होणाऱ्या शहरात नवी मुंबईचे नाव आहे. पंधरा वषार्र्पूर्वी पालिकेने जलसंपदा विभागाकडून विकत घेतलेले मोरबे धरण हे नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण केलेले आहे. औद्योगिक नगरी असल्ययाने रोजगाराच्या अनेक संधी असून एमआयडीसीत अनेक आयटी हब उभे राहिलेले आहेत. त्यामुळे फ्लोटिंग लोकसंख्या दोन ते तीन लाखांच्या घरात गेली आहे. २०११च्या जनगणनेनुसार नवी मुंबईतील लोकसंख्या ११ लाख असून यंदा होणाऱ्या जनगणेत ही संख्या १६ ते १७ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दळणवळणाची अनेक साधने नवी मुंबईत निर्माण झाली असून रेल्वेची २९ स्थानके आहेत. स्वच्छ भारत अभियानात हे शहर राज्यात सातत्याने गेली पाच वर्षे पहिल्या क्रमांकवर असून देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. नवी मुंबईतील झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनशैली देखील चांगली असून या सर्वेक्षणात त्यांचा विचार केला गेला आहे.

शहरातील सुशिक्षित नागरिकांची लोकसंख्या ९६ टक्के आहे. ग्रामीण भागानेही शहराला आपलेसे केले आहे. प्रदूषण आणि पर्यावरण याबाबत हे शहर इतर पाच शहरांच्यापेक्षा पिछाडीवर आहे. त्यामुळे आतापर्यंत या शहराला अनेक पुरस्कारांत हुलकावणी दिली गेली आहे.