पोलिसांकडून फक्त २७ मद्यपी चालकांवर कारवाई

नवी मुंबई : संचारबंदीमुळे या वर्षी नवी मुंबईकरांनी अगदी साधेपणाने नव वर्षांचे स्वागत केले. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात मद्यपी चालकांवर पोलीस कारवाई करीत असतात. मात्र यावर्षी फक्त २७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी घरीच राहत सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत केले.

मद्यपी चालकांवर कारवाई कमी झाली असली तरी गेल्या दोन दिवसात नाकाबंदीत वाहनचालकांच्या बेशिस्तीचे दर्शन मात्र घडले. वाहतूक नियम मोडणाऱ्या सुमारे चारशे वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईत दरवर्षी माठा जल्लोष असतो. मुख्य आकर्षण असते ते पामबीच रस्त्यावरील पालिका मुख्यालय परिसर. या ठिकाणी रोषणाई करण्यात येत असून नवी मुंबईसह, उरण, पनवेलमधील नागरिक मोठय़ा संख्येने येत असतात. मात्र या वर्षी करोनामुळे या सर्व जल्लोषावर र्निबध आले. त्यातच सांचारबंदी लागून केल्यामुळे रात्री ११ नंतर घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाईला सामोरे

जावे लागणार असल्याने नागरिकांनी या वर्षी घरीच राहत नव वर्षांचे

स्वागत केले. त्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंटही  बंद असल्याने दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसून आला नाही. सोसायटीतील कार्यक्रमांवरही र्निबध घातल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.

तरीही काही अतिउत्साही नागरिकांनी खास करून युवकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली. सलग दोन दिवस रात्रंदिवस लावण्यात आलेल्या बंदोबस्तात एकूण ४२२ जणांवर कारवाई करण्यात आली. यात २७ मद्यपी चालक, २७० विना हेल्मेट, १०१ विना सीट बेल्ट, २४ ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ३४० मद्यपी चालकांवर कारवाई

यावर्षी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान २७ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. २०१९-२०२० च्या ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान ३४० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती. तर २०१८-१९ मध्ये ३५३ जणांवर कारवाई केली होती.

नवी मुंबईकरांनी चांगले सहकार्य केले. यावर्षी मद्यपी चालकांच्या कारवाईत मोठी घट झाली. कारवाईत वाहतूक नियम मोडणारे चालक मात्र जास्त होते. नवीन वर्षांत वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तीचे दर्शन घडवावे.

-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक विभाग