नवी मुंबई : नेरुळमधील बेपत्ता सचिन गर्जे याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी बेपत्ता आहे. दोन महिन्यांपासून सचिन उरणमधील मित्रांना भेटून येतो सांगून गेला तो परतला नव्हता. बेपत्ता झाल्याची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात नोंद होती.

विक्रांत कोळी (वय २२, पनवेल), नारायण पवळे (वय २७, कळंबोली) आणि रूपेश झिराळे (वय २३, पनवेल) यांना अटक केली असून  मुख्य आरोपी विकी देशमुख हा फरार आहे. विकी आणि मृत सचिन यांची ओळख तुरुंगात झाली होती.

जामिनावर सुटल्यानंतर काही कारणावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. यावरून विकी याने सचिन याला मारण्यासाठी सुपारी दिली होती. १४ सप्टेंबर रोजी उरणला जाण्यासाठी सचिन घराबाहेर पडला.

त्याचवेळी त्याचे सीवूड्स येथून तिघांनी अपहरण केले. त्यानंतर गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली.  त्याचा मृतदेह उरणच्या खाडीत फेकून दिला. हत्येचा गुन्हा उघड होईल, या भीतीने तिघांनी मिळून सचिनचा मृतदेह उरणनजीक तो जाळला.

सचिनचा मोबाइल सीवूड्स येथील एका मॉलजवळ बंद झाल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले. त्यावरून या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. यात आरोपींची ओळख पटविण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिघांनी आपल्या  गुन्ह्य़ाची कबुली दिली.  फरार मुख्य आरोपी विकी देशमुख याचा शोध पोलीस घेत आहेत.