07 July 2020

News Flash

नवी मुंबईत जनजीवन ठप्प

नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये झाडे कोसळून वाहनांचे नुकसान

नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये झाडे कोसळून वाहनांचे नुकसान

नवी मुंबई : निसर्ग वादळाच्या तडाख्याने नवी मुंबईची वाताहत झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या ६४ घटना घडल्या. यात वाहनांचे नुकसान झाले. याच वेळी पनवेल आणि उरण तालुक्यात बुधवारी दुपारी शहरात वादळी वारे सुरू झाले. यात दिवाळे, बेलापूर, वाशी, नेरुळ, सीवूड्स आणि ऐरोलीत ठिकठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे इमारतीवरील लोखंडी पत्रे उडाले. बेलापूर आणि नेरुळ भागांत वादळाचा सर्वाधिक फटका बसला. या भागांत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात अनेक दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांचे नुकसान झाले.

सावधगिरीचा उपाय म्हणून नवी मुंबई पालिका प्रशासनाने धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये काहींना ठेवण्यात आले होते.

नेरुळ विभागात शिरवणेतील  पालिकेच्या शाळेचे पत्रेही उडाल्याची घटना घडली. पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या फांद्या कापून झाडांचे ओंडके रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचले होते. त्याचाही निचरा करण्यात आला.

निसर्ग या वादळाचा वेग दुपारी ४ नंतर ओसरला परंतू पावसाची संततधार सुरूच असल्याचे चित्र नवी मुंबईत  पाहायला मिळाले. धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना महापालिकांच्या शाळांमध्ये हलविण्यात आले होते, तसेच त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

बेलापूर विभाग— दुर्गामातानगर, संभाजीनगर, रमाबाई आंबेडकरनगर येथील २०० नागरिकांना बेलापूर सेक्टर- ८ येथील शाळेत, तर नेरुळ येथील रमेश कॉरी झोपडपट्टीतील नागरीकांना १३० नागरीकांना नेरुळ, सारसोळे आणि शिरवणे येथे स्थलांतरीत करण्यात आले होते.

पनवेलमध्ये पडझड

’ पनवेल पालिका हद्दीत अनेक वर्षे जुने वृक्ष कोलमडून वाहनांवर पडले. सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या मात्र विजेचे खांब कोसळून रस्त्यावर पडले.

’ कळंबोली पोलीस ठाण्याच्या इमारतीवर मोठे वृक्ष उन्मळून पडले. इमारतीवरील शेड मुळे पहिल्यांदा तुटले. पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्यासह कर्मचारी त्यावेळी काम करत होते. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम धोकादायक आहे. अनेक ठिकाणी खारघर व पनवेलमध्ये इमारतीवरील पत्रे निखळून खाली पडले. पनवेल शहरातील साईनगर जास्मिन चॅनल उपवन इमारतीच्या छतावरील पत्रे उडाले. यात कोणीही जखमी नाही.

’ खारघर येथील हिरानंदानी इमारतीजवळ उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर झाडे पडली.  कळंबोली येथील कार्मेल शाळेजवळ, वडघर बसस्थानक येथे वृक्ष आणि विजेचा खांब कोसळला. सायंकाळी पाच वाजेनंतर विजय महावितरण कंपनी वीजा व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रय करत होते.

’ वादळ शांत झाल्यानंतर भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला. पनवेल शहरात एचओसी कॉलनी, वडघर, स्टिल बाजार येथे विजेचा खांब कोसळला.

बैठय़ा घरांवर झाड कोसळले

१० बैठय़ा घरांवर झाड कोसळले. त्यात दोन घरांचे नुकसान झाले. या घरांमध्ये २५ जण अडकले होते. परंतु, त्यांना सुखरुप बाहेर काढले आहे.या घरांसमोरच असलेले मोठे वडाचे झाडाचे कोसळल्याने झाडय़ांच्या फांद्यांमुळे दरवाजातून या नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. पालिकेच्या  पथकाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापून रहिवाशांना बाहेर काढले.

पाऊसमान

’ बेलापूर—२८.८० मिमी.

’ नेरुळ—२५.२० मिमी.

’ वाशी—१५.०० मिमी.

’ कोपरखैरणे—१४.८० मिमी.

’ ऐरोली—१३.०० मिमी.

’  शहरात सरासरी पाऊस —१९.३६मिमी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 2:19 am

Web Title: nisarga cyclone vehicles damage due to falling trees in navi mumbai panvel uran zws 70
Next Stories
1 ६०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज
2 पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वदूर प्रादुर्भाव
3 स्थलांतरित रहिवाशांना ‘जेवणा’बरोबर ‘मुखपट्टी’
Just Now!
X