पालिका-सिडकोच्या नियमावलीच्या फेऱ्यात दत्तगुरु सोसायटीचा पुनर्विकास रखडला

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाच्या नियमांत अडकलेल्या नेरुळ सेक्टर-६ मधील दत्तगुरू सोसायटीची दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. सोसायटीच्या इमारतींमध्ये वारंवार पडझडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे १३६ कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे.

दत्तगुरू सोसायटीच्या हक्काचे ३९४ मीटर क्षेत्र कंडोमिनियम प्लॉटमध्ये करून देण्याची मागणी सिडकोकडे २००९ पासून करीत होती. त्याला सिडकोने मंजुरी देऊन सोसायटीने त्यासाठीची रक्कमही सिडकोकडे भरली होती. परंतु त्यात अडीच एफएसआयद्वारे पुनर्बाधणी शक्य नसल्याने आता सिडकोकडून या इमारतीला अतिरिक्त जागा देण्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु सिडको आणि पालिकेच्या लालफितीत या इमारतीचा पुनर्विकास अडकला आहे.

सिडकोने नेरुळ सेक्टर-६ मध्ये बांधलेल्या ए एक, ए दोन टाइपच्या इमारतीत अल्प व मध्यम उत्पन्न गटातील रहिवासी राहतात. इमारती बांधताना दोन इमारतींचे क्षेत्रफळ दोन हजार तीनशे साठ चौ.मी. इतके असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ‘बिल्टअप एरिया’नुसार ११८० चौरस मीटरच क्षेत्रफळ दिले गेले. त्यामुळे दोन इमारतींचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ २३६० आवश्यक असताना हे क्षेत्रफळ सिडकोकडे १९६६ एवढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे नियमानुसार हक्काचे असलेले ३९४ मीटर क्षेत्र कंडोमिनियम प्लॉटमध्ये करून देण्याची मागणी रहिवासी सिडकोकडे वर्षांनुवर्षे करीत आहेत.

सिडकोने अडीच एफएसआयच्या निर्णयानुसार नवी मुंबईतील पहिले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दत्तगुरू सोसायटीला दिले होते. पण कंडोमिनियमचे वाढीव क्षेत्र प्राप्त होत नव्हते. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही याबाबत सिडकोला योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या.पालिकेने या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित करून इमारत खाली करण्याचे पत्र पोलीस विभागाला दिले आहे.

इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा

  • सिडकोच्या नियोजन विभागाने सोसायटीने केलेल्या मागणीनुसार ‘कंडोमिनियम’ला लागून असलेल्या मोकळ्या जागेमधून ३९४ चौरस मीटर अतिरिक्त जागा देण्याचे मान्य केले होते, परंतु या भूखंडावर वाढीव अडीच एफएसआय देता येत नसल्याने आता रहिवाशांनी सिडकोकडे या इमारतीसाठी अतिरिक्त भूखंड देण्याची मागणी केली आहे. आमची मागणी मान्य केल्यास खासगी विकासकाकडून इमारतीची पुनर्बाधणी करून घेता येणार आहे. परंतु पालिका व सिडकोच्या लालफितीत १३६ कुटुंबे मात्र रोज जीवनमरणाचा लंपडाव भोगत आहेत.
  • दत्तगुरू सोसायटीची इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. इमारतीत चालतानाही मधला पॅसेज खालीवर झाल्याचे दिसून येत आहे. इमारतीच्या मुख्य बीममधील सळ्या बाहेर दिसत आहेत. एका बाजूचा बीम तिरका झाला आहे. स्ट्रक्चरच कुचकामी झाल्याने इमारतीत जातानाच भीती वाटते. इमारतीत छताचा भाग कोसळून नागरिकही जखमी झाले होते. पालिकेने सात वर्षांपूर्वीपासूनच इमारत धोकादायक असल्याचे पत्र देऊन इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

आमच्यावर मृत्यूचे संकट आले आहे. सातत्याने इमारतीत पडझडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सिडको आणि पालिकेला याबाबत पत्रही दिले आहे. दोन्ही प्रशासनांनी सोसायटीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.

दिलीप आमले, रहिवासी, दत्तगुरू सोसायटी

दत्तगुरू सोसायटीला इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रहिवासी इमारत खाली करत नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही इमारत खाली करून घेण्याबाबत पत्र दिले आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सिडकोने दत्तगुरू सोसायटीला अतिरिक्त भूखंड देण्याचे मान्य केले होते. परंतु त्यात सोसायटीचे अडीच एफएसआयनुसार पुर्नबांधणी करता येणे शक्य नसल्याने आता सोसायटीने पालिकेच्या शेजारील दुसरा भूखंड देण्याची मागणी सिडकोकडे केली आहे. याबाबत नियमानुसार योग्य निर्णयप्रक्रिया सुरू आहे.

मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी सिडको

सिडकोकडे पुनर्बाधणीसाठी इमारतीशेजारील भूखंड देण्याची मागणी केली आहे. सिडको आणि पालिकेच्या टोलवाटोलवीत इमारतीतील रहिवासी अडचणीत आले आहेत. याबाबत पालिका सभागृहात आवाज उठवणार आहे.

सूरज पाटील, नगरसेवक