‘स्लो मॅन’च्या बिरुदावलीला पालिका आयुक्तांचे ठोस प्रतिउत्तर

नवी मुंबई पालिकेचा कारभार संथगतीने सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसला पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी एकाच महिन्यात ५२६ कोटी रुपयांची नागरी कामे जाहीर करून ठोस प्रतिउत्तर दिले आहे.

शहरातील प्रत्येक नागरी कामाची स्व:त पाहणी केल्याशिवाय आयुक्त त्या कामांना मंजुरी किंवा त्याचे दयेक देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नगरसेवकांनी स्लो मॅनचा शिक्का मारला आहे. त्याला आयुक्तांनी नागरी कामांचा सपाटा लावून उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे ही कामे अंदाज पत्रकातील सरासरी किमतीत करण्याची अट घातली जात असल्याने पालिकेचे कोटय़वधी रुपयांची बचत होत असून टक्केवारीला आळा बसला आहे.

पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची दोन वर्षांपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. रामास्वामी यांनी नियुक्ती शासनाने केली आहे. आवश्यक असलेल्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन अनावश्यक कामांची पाहणी केल्यानंतरच निर्णय घेण्याची रामास्वामी यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेल्या सर्वच कामांना हिरवा कंदील मिळत नाही. प्रभागातील सर्वच कामे होत नसल्याने नगरसेवकांचे हात ओले होत नाहीत. मुंढे यांच्यामुळे दहा महिने वाया गेलेल्या नगरसेवकांचे जवळपास गेली दोन वर्षे वाया जात असल्याने नगरसेवकामध्ये खदखद आहे. आवश्यक असलेली काही कामे आयुक्तांनी केली असून ती काही नगरसेवकांच्या प्रभागातील कोटय़वधीच्या घरातील आहेत.

मागील काही दिवसांपासून आयुक्त आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात विस्तव जात नाही. याला काही विरोधी पक्षातील नगरसेवकांचीही साथ आहे. आमची कामे होत नाहीत असा सर्रास आरोप जाहीर सभेत केला जात आहे. कमीत कमी बोलणारे आयुक्त या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण तो निष्फळ ठरविला जात आहे. महापौर जयवंत सुतार यांनी तर पालिका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच पालिकेच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना चिक्की, गणवेश, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची बदली, रस्ता रुंदीकरण आणि इतर आयुक्तांच्या कामांवरून हे शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्याला उत्तर देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

१९ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी चक्क ५२६ कोटी रुपये खर्चाची कामे जाहीर करून टाकली आहेत. सर्वसाधारपणे महासभेत येणाऱ्या नागरी कामांची सभेपूर्वी वाच्यता केली जात नाही. आयुक्तांनी या कामांची थेट प्रसिद्धी पत्रक काढून विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

यात पालिका रुग्णालयांसाठी लागणारे औषध भंडार, तुर्भे येथील क्षेपणभूमीवरील पाचवा सेल बंद करण्याचा प्रस्ताव, घणसोली येथील बहुउद्देशीय इमारत, समाज मंदिर, व्यासपीठ या कामाचा समावेश असून वाशी सेक्टर १२ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव, वाणिज्य संकुल, बस आगार, क्रीडा संकुल व शहरातील मोक्याच्या जागेवरील सीसी टीव्ही कॅमेरे या सुमारे साडेपाचशे कोटींच्या कामांचा समावेश आहे.

अर्थसंकल्पातील तरतूद करण्यात आलेला निधी वापराविना शिल्लक राहिला हा नगरसेवकांचा होणाऱ्या संभाव्य आरोपांना आयुक्तांनी अशा प्रकारे उत्तर दिले आहे.

जानेवारी महिन्यात ५२६ कोटी

जानेवारी महिन्यात ५२६ कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केलेले असताना यापूर्वी हजारो कोटीचे साडेचार हजार छोटे मोठे कामे शहरात सुरू आहेत.

* बेलापूर सेक्टर ११ येथे पार्किंग प्लाझा : २२ कोटी.

* सिबिडी येथे नवीन अग्निशमन दल  : ६ कोटी.

* सिटी मोबिलिटी आराखडय़ानुसार (रस्ता) : ४.५ कोटी

* उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपूलापर्यत रस्ता : ३८. ४८ लाख

* नेरुळ रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी भुयारी मार्ग  : १.२५ लाख

* जुईनगर येथे पशुवैद्यकीय रुग्णालय : ४.७८ कोटी

* वाशी सेक्टर १५ येथे पदपथ गटर :  ८ कोटी

* वाशी रेल्वे स्थानक परिसर नूतनीकरण : १.१० कोटी

* अमृत योजने अंर्तगत उद्याने : ५.५० :

* तुर्भे उड्डाणपूल : २४ कोटी

* कोपरखैरणे पादचारी पुल : ८ कोटी

* अदिवासी घरकुल : ७५ लाख

* घणसोली नोड (हस्तांतरित केलेला) : ९९ कोटी

*  पटनी रस्ता ऐरोली  : ४८ कोटी