28 May 2020

News Flash

करवाढ टाळून विकासावर भर

शहरातील मालमत्ता आणि पाणीपट्टी अशा प्रकारची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही.

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्याकडे सादर केला.

३, ८५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर * गतवर्षीची उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर * एक कोटी ९ लाखांची शिलकी

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीत सादर करण्यात आला. तीन हजार ८५० कोटी रुपयांची जमा आणि तीन हजार ८४८ कोटी रुपये खर्चाचे आणि एक कोटी ९ लाख रुपये किमतीच्या शिलकीचा मूळ अर्थसंकल्प पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीकडे सुपूर्द केला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर काही मोजके नवीन प्रकल्प वगळता गतवर्षीच्या जुन्या अर्थसंकल्पातील उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर दिल्याचे चित्र या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले आहे.

शहरातील मालमत्ता आणि पाणीपट्टी अशा प्रकारची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. गेल्यावर्षी तीन हजार १२१ कोटी ९३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा ३३४ कोटी अधिक जमा रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

नागरिकांच्या हिताचा भविष्यातील विचार करता हा अर्थसंकल्प भौतिक आणि नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच सर्वोत्तम आरोग्य, शिक्षण, परिवहन आणि पर्यटन यासारख्या चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे निश्चित करण्यात आली आहेत, परंतु अनेक जुन्या प्रकल्पांनाच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.

यंदा गतवर्षीपेक्षा जवळजवळ ३९५ कोटी अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पन्न असलेल्या आर्थिक स्रोतापासून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. पालिकेच्या कामकाजात ई-गव्हर्नसचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. पालिकेचा कारभार गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यात येत असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. आगामी वर्षांत वाशी, नेरुळ आणि ऐरोली येथील आरोग्यसेवा पूर्ण क्षमतेने देताना या आर्थिक वर्षांत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित केल्याचे ते म्हणाले.

‘एनएमएमटी’ची भिस्त अनुदानावरच

* नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाने तिकीटामध्ये कोणतीही दरवाढ केली नसून  पालिकेच्या परिवहन उपRमाची मदार ही पालिकेच्या अनुदानावरच राहणार असल्याचे अर्थसंकल्पावरुन दिसून येत आहे.

* परिवनहच्या अर्शसंकल्पात सर्व बसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे संकल्पित असून नवी स्मार्ट कार्ड योजना वातानुकूलित तसेच साध्याबसेसमध्येही  उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

* आगामी आर्थिक वर्षांत शहराला  आणि परिवहन उपक्रमालाही फायदेशीर ठरणाऱ्या १०० विद्युत बस आणि ४० सीएनजी बस घेण्याचे उद्दिष्ट आहे.

* एनएमएमटीचा आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी वाशी सेक्टर -९ येथील वाणिज्य संकुल आणि बसस्थानाच्या कामाला मूर्त रुप देऊन उपक्रमाला निधी उपलब्ध करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वाशी डेपो प्रमाणेच  वाशी सेक्टर -१२ येथील टर्मिनस व आगारांचा विकसित करणेबाबत निविदा प्रस्तावित आहे.

शहर सुसह्य़ करणार

पालिकेच्या २०२० या आर्थिक वर्षांच्या अंदाजात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नसून शहरात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. आरोग्य, शिक्षणासह सर्वच नागरी सुविधा अधिकाधिक दर्जेदार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जलसंपन्न शहर, पर्यटन, नागरी सुरक्षा याबाबतही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही नवी मुंबई शहर सुसह्य़ वाटावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

आगामी वर्षांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प

* तुर्भे क्षेपणभूमीवरील नव्या सातव्या कक्षाची निर्मिती

* नागरी सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे

* सक्षम अग्निशमन यंत्रणांसाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी

* जाहिरात फलकांसाठी धोरण

* शहरात आकर्षक प्रवेशद्वारे

* शून्य कचरा झोपडपट्टी योजना राबवणे

* मियावाकी फॉरेस्ट संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे

 

वर्षनिहाय अंदाजपत्रक

वर्ष            अंदाजित      प्रत्यक्ष

२०१३-१४       २६८०      १४८०

२०१४-१५       २१००      १५९५

२०१५-१६       १९५६      १८७७

२०१६-१७       २०१४       २१२८

२०१७-१८       २९८७       ३०३१

२०१८-१९       ३६७१        ३७५६

२०१९-२०       ४०२०       ४२७५

आकडे कोटी रुपयांत

अंतर्गत रस्त्यांवर चार उड्डाणपूल

अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत असल्याने नवी मुंबईत वाहतूक कोंडी ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. हा ताण कमी करण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात चार ठिकाणी उड्डाणपुलांचे नियोजन केले आहे. आग्रोळी तलाव ते कोकन भवन, वाशी सेक्टर १७ येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत उन्नत मार्ग तसेच विस्तारीत पामबीच मार्ग पूर्ण करण्यासाठी घणसोली ते ऐरोली येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

थकबाकीदारांसाठी अभय योजना

विविध करांपोटीची २२०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात १२०० कोटींची थकबाकी ही एकटय़ा एमआयडीसीमधील आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. यातून थकबाकी वसुली चांगली होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

घणसोली येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल

नवी मुंबईत खेळाच्या मैदनासाठीही पालिकेने पुढाकार घेतला असून घणसोली येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. मैदान विकास अंतर्गत नेरुळ सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण मैदानाचा विकास करण्यात येणार असून विविध खेळांसाठीची स्वतंत्र लॉन विकसित करण्यात येणार आहे.

सायन्स पार्क मार्गी लागणार

नवी मुंबई शहराची ओळख ठरणारा नेरुळ येथील विज्ञान केंद्रासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने हा प्रकल्प पुढील काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे. नेरुळ येथील वंडर्स पार्कजवळ, सेक्टर १९ अ येथे हे विज्ञान केंद्र संकल्पित आहे. यासाठी पालिकेने ८७.२६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबवली आहे. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम रखडले आहे.

पाणी वितरणात १४.३४ कोटींची तूट

महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे पाण्याच्या दृष्टीने शहर स्वयंपूर्ण असून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर अत्यंत कमी पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. पाणीपट्टीपोटी २०१८-१९ मध्ये १०५.२४ कोटी इतकी रक्कम जमा झाली असून यावर ११९.५७ कोटी इतका खर्च झाला आहे. पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या जमा-खर्चाचा विचार करता यात १४.३४ कोटी एवढी तूट आहे. शासन निर्देशानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेचा खर्च हा १०० टक्के पाणीपट्टी उत्पन्नातून करणे आवश्यक आहे. शिवाय नागरिकांना इतर दर्जेदार सोयी सुविधाही यातून पुरवल्या जाव्यात अशी अटकळ आहे. असे असताना कमी पाणीपट्टीमुळे यात मोठी तूट होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीपट्टी व इतर करांत वाढ करण्याचे विचाराधीन आहे. पाणीपट्टीचे दर सुरळीत करण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

नेरुळमध्ये वृद्धाश्रम

शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी पालिकेने विविध विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनविले आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी आदरभाव व आपुलकीच्या भावनेतून नेरुळ येथे वृद्धाश्रम बांधण्याचा संकल्प सोडला आहे.

तरण तलावासाठी निधी

शहरातील महापालिकेचा पहिला तरण तलाव वाशी सेक्टर १२ येथे करण्याचे नियोजित असून ऑलिपिंक दर्जाच्या तरण तलावाची निर्मितीसाठी १२४ कोटी खर्च अपेक्षीत आहे. हा तरण तलावही निविदांच्या फेऱ्यात अडकला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

‘ज्वेल’मध्ये नौका विहार

नवी मुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने वाशी सेक्टर १० मिनी सी शोअर तसेच कोपरखैरणे सेक्टर १९ गणेश विसर्जन तलाव व दिघा येथील खोकड तलाव येथे नौकाविहार सुरू केले आहे. याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही नौकाविहारची सोय करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

जनसायकल विस्तार

नवी मुंबई शहरात पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्यासाठी पालिकेने जनसायकल सहभाग प्रणाली व ई बाईक संकल्पाना अमलात आणली आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार ६२ नागरिकांनी याला प्रतिसाद दिला आहे. ३३ लाखाच्यापेक्षा अधिक या पर्यावरणपूरक सायकल चालवण्यात आल्या आहेत. त्यामुळे याला उपक्रमाला अधिक विस्तारित करण्याचा पालिकेचा संकल्प आहे.

रुपया असा येणार

*  आरंभीची शिलकी : १२१७ कोटी ७६ लाख

* स्थानिक संस्था कर  :१२५० कोटी  ७१ लाख

*  मालमत्ता कर : ६३० कोटी

*  विकास शुल्क : १२५ कोटी

* पाणीपट्टी : ११५ कोटी

*  परवाना व जाहिरात शुल्क : १० कोटी ७ लाख

* अतिक्रमण शुल्क : ४ कोटी १० लाख

* मोरबे धरण व मलनिस्सारण : २० कोटी १८ लाख

* रस्ते खोदकाम शुल्क : ३५ कोटी ६७ लाख

* आरोग्य सेवा शुल्क : १० कोटी ९ लाख

* केंद्र व राज्य शासन योजना :१६० कोटी ५६ लाख

*  संकीर्ण जमा : २६३ कोटी ९७ लाख

*  एकूण : ३८५० कोटी

रुपया असा जाणार

* नागरी सुविधा : ९८७ कोटी ११ लाख

*  प्रशासकीय सेवा : ६३८ कोटी ६९ लाख

* पाणीपुरवठा व मलनिस्सारण : ५८० कोटी ९१ लाख

* इतर नागरी सुविधा : ३८९ कोटी.७२ लाख

* सामाजिक विकास : ४३ कोटी ७२ लाख

* स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन : ४२९ कोटी १५ लाख

*  केंद्र व राज्य शासन योजना : ९०कोटी १८ लाख

* आरोग्यसेवा : १६६ कोटी ६० लाख

*  ई गव्हर्नन्स :२२ कोटी ६५ लाख

* परिवहन सेवा : ९६ कोटी

* आपत्ती निवारण : ८५ कोटी ८३ लाख

* शासकीय कर परतावा :११६ कोटी ५० लाख

* शिक्षण विभाग : १५२ कोटी ७३ लाख

* कर्ज परतावा : ३८ कोटी १५ लाख

* अतिक्रमण : ११ कोटी १२ लाख

* एकूण खर्च : ३८४८ कोटी ९१ लाख

* शिलकी : १ कोटी ९ लाख

अर्थसंकल्प हा वास्तववादी असून शहरात असणाऱ्या नागरी समस्या सोडवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. पार्किंगसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून वाहनतळ धोरण राबविण्यात येणार आहे. याशिवाय रस्ते बांधकाम, सायकल मार्गिका अशा कामांवर भर देण्यात आला आहे. आगामी काळात मालमत्ता कर वाढवावाच लागणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका

अर्थसंकल्प पूर्ण वाचण्यात आला नाही. मात्र प्रथमदर्शनी अर्थसंकल्पाबाबत समाधानी नाही. ३ हजार ८०० कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यात मालमत्ताकर वसुली समाधानकारक नाही. गेल्या अर्थसंकल्पात नाला व्हिजन, सीसीटीव्ही, सिटी मोबिलिटी यासह अनेक प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली होती, मात्र यातील एकही काम पूर्ण झाले नाही. परिणामी हीच कामे यंदाच्या अर्थसंकल्पात आढळून आल्या आहेत.

-जयवंत सुतार, महापौर

अर्थसंकल्प अद्याप पर्ण वाचला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. मात्र परिमंडळ दोनमध्ये भरीव तरतूद केली असावी अशी अपेक्षा आहे.

-विजय चौगुले, विरोधी पक्षनेता

भारतात जी शहरे प्रदूषित आहेत, त्यात नवी मुंबई येते. यावर उपाययोजना किंवा र्निबधाबाबत अर्थसंकल्पात विशेष तरतूद अपेक्षित असताना ती करण्यात आली नाही. एमआयडीसीचे दूषित पाणी नाल्यात सोडण्याबाबत उपाययोजना वा शुद्धीकरणाची तरतूद करण्यात आलेली नाही. याकडे दुर्लक्ष केले आहे.

-बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:48 am

Web Title: nmmc commissioner present budget of rs 3850 crore focuses on public works zws 70
Next Stories
1 सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामाच!
2 ‘डीवायएफआय’चा मोर्चा पोलिसांनी पुन्हा रोखला
3 कर्नाळा बँक गैरव्यवहार: विवेक पाटील यांच्यावर गुन्हा
Just Now!
X