पावसाळ्यातील इतर साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यात यश येण्याचा पालिकेचा दावा

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई :  पालिकेने नवी मुंबईतील समूह तपासणीची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे बाधितांची माहिती तातडीने मिळण्यात मदत होत आहे. त्यांना योग्य वेळेत उपचार होत असल्याने या वर्षी पावसाळी साथीच्या आजारावर नियंत्रण येणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शहरातील बहुतेक खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यात साधारण ताप, सर्दी-खोकला, मलेरिया आणि डेंग्यू अशा प्रकारचे हजारो रुग्ण दरवर्षी सापडतात. मात्र, यंदा करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या इतर साथीच्या आजाराच्या रुग्णांकडे  दुर्लक्ष होत आहे. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एकीकडे पावसाळ्यात साथीच्या आजाराचा रुग्ण व करोनाचा रुग्ण अशी विभागणी करताना मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे समूह तपासणीची इतर आजारांना आटोक्यात आणण्यास मदतच होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी २०१९ मध्ये पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ४१ हजार ६५३ साथीच्या आजाराचे रुग्ण सापडले होते. त्यात २४ मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण होते. दुसरीकडे  वर्षभरात  साथीच्या आजारांची रुग्णांची संख्या सव्वा लाखाजवळ पोहोचली होती.

७२ समूह तपासणी ठिकाणे

४०,४०० आजवर झालेली समूह तपासणी


साथीच्या आजारांची २०१९ ची स्थिती

४१६५३ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर रुग्णसंख्या

१,२१ ,६८६  जानेवारी ते डिसेंबर रुग्णसंख्या

१२ टाळेबंदीच्या ठिकाणी आजवर ५ हजारांहून अधिक जणांची समूह तपासणी करण्यात आली आहे.

पावसाळ्यात साथीच्या  रुग्णांची समूह तपासणीमुळे माहिती मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे हे आजार आटोक्यात राहतील.

अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त