सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार नवी मुंबई पालिका वाशी, ऐरोली, नेरुळ आणि बेलापूर या चार ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा सर्व खर्च पालिका करणार असून पालिका रुग्णालयांतील रुग्णांबरोबरच बाह्य़ रुग्णांनादेखील ही स्वस्त औषधे उपलब्ध होणार आहेत. हा प्रस्ताव सर्वसाधाररण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारे जेनेरिक औषधालय सुरू करणारी नवी मुंबई ही दुसरी पालिका आहे.

केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ फार्मा पीएसयूएस ऑफ इंडियाच्या वतीने देशात सर्वसामान्य व गरीब रुग्णांना परवडणाऱ्या औषधांची दुकाने सुरू केली जात आहेत. त्यासाठीचा औषध पुरवठा केंद्र सरकारच्या वतीने केला जात असून व्यावसायिक औषध दुकानांत मिळणाऱ्या औषधांच्या किमतीपेक्षा ही औषधे कैक पटींनी स्वस्त आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना त्यांचा मोठा आधार मिळत आहे. नवी मुंबई पालिकेने या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला असून पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात असलेल्या औषध दुकानांसाठी राखीव ठेवलेल्या गाळ्यात हे औषध दुकान सुरू केले जाणार आहे. या दुकानाची मुदत दोन महिन्यापूर्वी संपली आहे. यासाठी पालिका दुकानदाराला अडीच लाख रुपये अनुदान देणार असून मनुष्यबळ पुरविणार आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्याची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. या सेवेसाठी लागणारे मनुष्यबळ, फर्निचर, वातानुकूल यंत्रणा, शीतपेटी यावर  खर्च होणार असून त्यासाठी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे वाशी येथील मध्यवर्ती रुग्णालय तसेच ऐरोली, नेरुळ येथील नवीन सार्वजनिक रुग्णालये आणि बेलापूर येथील रुग्णालयात ही दुकाने आर्थिक वर्षांपासून सुरू होणार आहेत. याचा फायदा नवी मुंबईतील रुग्णांना तर होणारच आहे पण नवी मुंबईतील पालिका रुग्णालयात चेंबूर, गोवंडी, मुंब्रा या आजूबाजूच्या शहरांतून येणाऱ्या रुग्णांनाही ही स्वस्त औषधे खरेदी करता येणार आहेत.