पालिका व निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक ; इच्छुकांचे लागले लक्ष

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या निवडणुकीचे वेध सर्वानाचा लागले आहेत. मात्र, प्रभाग आरक्षण सोडत कधी होणार याची उत्सुकता आहे. सोमवारी पालिका अधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात याच आठवडय़ात प्रभाग आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साधारणत: एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत शासनाने रद्द केल्यामुळे आधी जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करण्यात आली आहे. एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. लोकप्रतिनिधींची संख्या मात्र २०१५ च्या निवडणुकीप्रमाणेच राहणार आहे. परंतु प्रभागांचे आरक्षण मात्र नव्याने निश्चित होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याकडे इच्छुकांच्या नजरा आहेत.  सोमवारी महापालिका प्रशासन व निवडणूक अधिकारी यांच्यात  एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत प्रभाग आरक्षणाबाबतही चर्चा करण्यात आली असून या आठवडय़ातच प्रभाग आरक्षण जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.