News Flash

कोंडीमुळे एनएमएमटी खड्डय़ात

खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे एनएमएमटीच्या तब्बल ७०० बसफेऱ्या दररोज रद्द कराव्या लागत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन महिन्यांत परिवहनला तीन कोटींचा फटका; वाहतूक कोंडीमुळे दररोज ७०० फेऱ्या रद्द

मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद झाल्यानंतर करण्यात आलेले वाहतूक बदल, पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे आणि खड्डे बुजवण्याची कामे यांमुळे नवी मुंबईतील विविध रस्त्यांवर दिवसरात्र होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका नवी मुंबई परिवहन उपक्रमालाही (एनएमएमटी) बसला आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे एनएमएमटीच्या तब्बल ७०० बसफेऱ्या दररोज रद्द कराव्या लागत आहेत. त्यातच बसगाडय़ा कोंडीत अडकल्यामुळे डिझेलच्या खर्चातही प्रचंड वाढ होत आहे. या दोन्हींचा एकत्रित विचार करता एनएमएमटीचे दोन महिन्यांत तब्बल तीन कोटी बुडाले आहेत.

नवी मुंबई शहरातून जाणारे शीव-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, शीळफाटा रस्ता, उरण येथील महामार्ग या रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग अतिशय कमी झाला आहे. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असतानाच नवी मुंबई परिवहन उपक्रमालाही या कोंडीची झळ बसत आहे.

खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे परिवहनच्या २५ टक्के वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आहेत. एनएमएमटीच्या दिवसाला ३०३४ बसफेऱ्या होतात. मात्र यावर्षी जून आणि जुलै महिन्यांत दररोज सरासरी ७०० फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहेच, पण एनएमएमटीच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या काळात तिकिटांतून मिळणाऱ्या उत्पन्नात सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांची घट झाल्याचे उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

एकीकडे, तिकिटांतून मिळणारे उत्पन्न घसरले असतानाच, कोंडीत अडकून पडलेल्या बसगाडय़ांचा इंधनखर्चही वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून बसगाडय़ांना दररोज सुमारे २५०० लिटर अधिक डिझेल लागत आहे. सध्या डिझेलचे दर ७० रुपये प्रति लिटर असल्याने, या हिशोबाने एनएमएमटीला दररोज पावणे दोन लाख रुपयांचा अतिरिक्त डिझेल खर्च सोसावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत अशा प्रकारे तब्बल सव्वा कोटी रुपये उपक्रमाला जास्त मोजावे लागले आहेत, अशी माहिती आरदवाड यांनी दिली.

वाढ होण्याऐवजी घसरण

मे महिन्यातील सुट्टय़ांमुळे एनएमएमटीची प्रवासी संख्या दरवर्षी घसरते. मात्र जून आणि जुलै या महिन्यांत तिकिटांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दरमहा ७० लाख रुपयांची वाढ नोंदवली जाते, परंतु यंदा ७० लाख रुपयांची वाढ होण्याऐवजी उत्पन्नात ७० लाखांची घट झाली आहे. हे गणित विचारात घेता दरमहा दीड कोटी याप्रमाणे गेल्या दोन महिन्यांत उपक्रमाला तीन कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. जुलै महिन्याची आकडेवारी पाहता, गतवर्षी उपक्रमाला या महिन्यात ११ कोटी ९० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. हे उत्पन्न यंदा साडेबारा कोटींवर जाण्याचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात ते ११ कोटी २० लाख रुपये इतके झाले आहे.

पावसाळय़ाच्या दिवसात वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे उपक्रमाचे मोठे नुकसान होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात एनएमएमटीच्या सरासरी १५ टक्के वेळापत्रकावर परिणाम होतो. मात्र यंदा २५ टक्के वेळापत्रकाला फटका बसला आहे. दरवर्षी जून, जुलै महिन्यात तिकिटांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होते, मात्र यंदा त्यात लक्षणीय घट झाली आहे.

– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:12 am

Web Title: nmmt loss due to traffic
Next Stories
1 ‘अबोली’ चालकांसमोर मक्तेदारीचे आव्हान
2 सण नारली पुनवेचा..
3 तुर्भेतील खड्डय़ांचा वाहतुकीत अडथळा
Just Now!
X