ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासाची उरणमध्येच सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. पास काढण्यासाठी सध्या वाशी वा तुर्भे आगारात जावे लागते. इतर शेकडो प्रवाशांचीही हीच अवस्था आहे. येत्या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीपासून उरण शहरातील एनएमएमटीच्या वाहतूक नियंत्रण कक्षातूनच पास देण्याची व्यवस्था करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी आणि प्रवाशांनी केली आहे.
उरण ते नवी मुंबई या दरम्यान रोज ३० हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. या सेवेचा लाभ घेताना महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नोकरदार मंडळींना एनएमएमटीच्या पासाची सोय आहे; परंतु तो मिळविण्यासाठी नवी मुंबईतील तुर्भे आगार वा वाशी येथे यावे लागते. यात सुमारे ८०० ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या दरातील पासधारक आहेत.
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर घरत यांनी एनएमएमटी प्रशासनाने तातडीने सोय करावी, असे मागणीत म्हटले आहे. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एस.एफ.आय)या विद्यार्थी संघटनेनेही ही मागणी केली आहे.
या संदर्भात नवी मुंबईतील एनएमएमटीच्या बस आगाराशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक आमदार तसेच नगरपालिकेला बस आगारासाठी कार्यालय तसेच सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र त्याची अमंलबजावणी न झाल्याने बस नियंत्रणाचे काम करणाऱ्यांना उरणमध्ये अंधारात काम करावे लागत आहे.