नवी मुंबई शहरात करोनाचा कहर सुरुच असून दररोज करोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याने, नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत १० दिवसाचा लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा लॉकडाउन १९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जाहीर केला आहे.

शहरात १३ जुलैपर्यंत टाळेबंदी असताना दुसरीकडे करोनाबाधितांची संख्याही वाढतच चालली आहे. ठाणे  व इतर महापालिकांनी ८ दिवस टाळेबंदी वाढवली असून १९ जुलैपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचधर्तीवर नवी मुंबई शहरातही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईत शुक्रवारी एका दिवसातील सर्वाधिक  ३६१ नवे रुग्ण वाढले होते. तर शनिवारीही २५३ नवे रुग्ण वाढले असून, शहरात आज  ८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या ९ हजार १३२ झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ५ हजार ४५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर नवी मुंबई शेजारील ठाणे व इतर महापालिकांप्रमाणेच टाळेबंदीचा कालावधी ८ दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाळेबंदीमध्ये  शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी व अत्यावश्यक सेवा वगळता  शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी पालिकाही करोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरात १३ जुलैपर्यंत  टाळेबंदी सुरुच आहे. त्यात वाढ करुन शहरात ८ दिवस  टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात १९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत टाळेबंदी असेल, असे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितलं आहे.

नव्या निर्णयानुसार आता नवी मुंबईत १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते १९ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच नियम व अटी असणार आहेत. शिवाय, लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. तरी नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.