लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी कोपरखरणेत एका इमारतीत दुर्घटना घडून पाच जण जखमी झाले. यात धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचे बांधकाम हे फक्त १३ वर्षांपूर्वी झालेले होते. त्यामुळे ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीत जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अलीकडे आशा घटनांत वाढ झाली आहे.
पाच वर्षांपूर्वी कोपरखैरणे येथील संगम आणि त्यापूर्वी कल्पतरू या इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला होता. त्यामुळे रातोरात येथील रहिवाशांना राहते घर सोडावे लागले होते. अशीच घटना १५ वर्षांपूर्वी शिरवणे परिसरातही घडली होती.
१ डिसेंबर रोजी कोपरखैरणे सेक्टर १९ येथील सिल्वर सनद या इमारतीतील तिसऱ्या मजल्याचे छत दुसऱ्या मजल्यावर तर दुसऱ्या मजल्याचे छत पहिल्या मजल्यावर पडून पाच जण जखमी झाले आहेत. ज्या सदनिकेत दुर्घटना घडली त्यांना घर सोडावे लागले असून त्या इमारतीच्या विभागाचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या इमारतीत १६ सदनिका असून सर्वाचाच जीव टांगणीला लागला आहे. याबाबत रहिवाशांना संरचना तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र इमारतीची संरचना तपासणी करायची असते हे या घटनेनंतर समजल्याचे येथील काही रहिवाशांनी सांगितले.
नवी मुंबईत अशा वारंवार दुर्घटना घडत आहेत. यामुळे ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व जीर्ण झालेल्या इमारतींतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात या इमारतींचे सर्वेक्षण होत इमारत राहण्यायोग्य आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे अचानक अशी दुर्घटना होते. त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा दर्जा पाहून सजग राहावे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
अतिधोकादायक ५७ इमारती
नवी मुंबई पालिका ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे दरवर्षी सर्वेक्षण करते यात अतिधोकादायक आशा ५७ इमारती आहेत तर धोकादायक इमारती मिळून ही संख्या साडेचारशेच्या घरात आहे. जर पालिकेने ३० वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण केले तर हा आकडा वाढणार आहे.
३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करीत ती राहण्यायोग्य नसल्यास रहिवाशांना तशी नोटीस दिली जाते. अलीकडे यापेक्षा कमी वयाच्या इमारतीतही दुर्घटना घडत आहेत, हे गंभीर आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल.
– अभिजित बांगर, आयुक्त महापालिका