व्यवस्थापनाकडून अंतराच्या नियमांची कठोर अंमलबजावणी

नवी मंबई : अंतराच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी एपीएमसी व्यवस्थापनाने भाजीपाला बाजारात केवळ परवानाधारक गाळेमालकांना प्रवेशास परवानगी दिली आहे.

मध्यंतरी एपीएमसी आवारात वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणली न गेल्याने करोना संसर्गात वाढ झाली होती. एपीएमसीतील काही अधिकाऱ्यांनाच लागण झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्या लागल्या.

भाजीपाला हा जीवनावश्यक असल्याने बाजार आवारात घाऊक व्यापारी आणि किरकोळ ग्राहकांची गर्दी असते. सध्या श्रावण महिन्यात भाजीपाल्याची मागणी वाढते. या काळात ६०० ते ६५० वाहने बाजार आवारात दाखल होतात.

मात्र, त्यावर आता मर्यादा आणल्या गेल्या आहेत. सध्या आवारात ३२५ वाहनांनाच प्रवेश देण्यात आला आहे. त्याच वेळी परवानाधारक गाळेमालकांना आवारात प्रवेश दिला जाणार आहे. यात परवाना नसलेल्या आणि भाडे तत्त्वावरील व्यापाऱ्यांना आवारात यापुढे प्रवेशास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती उपसचिव सुनील सिंगतकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

किरकोळ विक्री केल्यावरून गाळ्यांना टाळे

एपीएमसीत करोनाकाळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी किरकोळ ग्राहक आणि विक्री यावर निर्बंध घालण्यात आले होते. दंडात्मक कारवाई करून देखील छुप्या पद्धतीने किरकोळ विक्री सुरू होती. त्यामुळे त्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने गाळा जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यासाठी काही गाळ्यांना टाळे ठोकले आहेत. किरकोळ विक्री करणाऱ्या मालकांचे गाळे आठ दिवसांसाठी बंद करण्यात येत आहेत. मात्र, या कालावधीत व्यापार करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याच्या नोटिसा संबंधितांना बजावल्या आहेत.