19 April 2019

News Flash

उघडय़ावर मांसविक्री महागात पडणार

विनापरवाना उघडय़ावर प्राण्यांची कत्तल करून मांसविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर नवी मुंबई पालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फौजदारी गुन्हे दाखल करणार; २ दिवसांत ३ विक्रेत्यांवर कारवाई

विनापरवाना उघडय़ावर प्राण्यांची कत्तल करून मांसविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर नवी मुंबई पालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. मागील दोन दिवसांत तीन विक्रेत्यांवर कारवाई करीत पालिकेच्या पथकाने २०० कोंबडय़ा व तीन बकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेचा स्वत:चा कत्तलखाना नाही. त्यामुळे मुंबईतील देवणार कत्तलखान्यातून कत्तल केलेले मांस या ठिकाणी आणून त्याची विक्री करावी असे अभिप्रेत आहे. या विक्रीसाठीही पालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे मुंबईत कत्तल केलेले मांस या ठिकाणी आणून विकण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. असे असताना नवी मुंबईतील अनेक मांस विक्रेते उघडय़ावर प्राण्यांची कत्तल करीत असून त्याच ठिकाणी त्यांची विक्री करीत असल्याचे सर्रास दिसून येते.

त्याची दखल घेऊन नवीन अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी खुलेआम प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल व विनापरवाना विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मांसाहार करणाऱ्यांची गरज भागविताना मांसविक्रीचा परवाना घेणे आवश्यक आहे. शहरात कुठेही कत्तलखाना नसल्याने या प्राण्याची कत्तल मुंबईहून करून आणणे आवश्यक आहे. मात्र येथील विक्रेते त्यांच्या दुकानातच किंवा आजूबाजूला आडोसा तयार करून ही प्राण्याची कत्तल करीत असल्याचे दिसून आले आहे. त्याला पायबंद बसणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने भरारी पथक तयार केले आहे, पण या भरारी पथकाचे हात ओले करून हे विक्रेते सर्रास बकरे व कोंबडय़ांची कत्तल करीत असल्याचे आढळून आले आहे. उघडय़ावर करण्यात येणाऱ्या या कत्तलीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा रहिवाशांनीही या उघडय़ावर कत्तल व विक्री करण्यात आलेले मांस खाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

आरोग्यासही घातक

उघडय़ावर कत्तल करण्यात आलेले हे मांस विक्रीसाठी खुलेआम त्याचे प्र्दशन केले जाते. २४ तासांनंतर हे मांस सडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्या वेळी अनेक प्रकारचे विषाणू या मांसावर बसत असून तेच मांस मांसाहारी मोठय़ा चवीने खात असतात. न विक्री केलेला हा मांस वातानुकूलित यंत्रणेत अनेक दिवस ठेवले जाते. त्यानंतर पुन्हा ते विक्रीसाठी मांडले जाते. त्यामुळे मांसाहारींना अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

First Published on December 6, 2018 2:39 am

Web Title: open hearted meat dishes will fall in the depths