हजार नवीन खाटा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १९ सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या वतीने ‘जम्बो’ सुविधांचे नियोजन केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे गुरुवारी ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. यात महत्त्वाचे म्हणजे आता पालिकेच्या करोना रुग्णालय व काळजी केंद्रात शौचालयांतही प्राणवायूची व्यवस्था पालिकेने केली आहे. याचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील तीन करोना रुग्णालय, तीन करोना काळजी केंद्रासह करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठीच्या १९ सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. यात नेरुळ येथील अत्याधुनिक प्रयोगशाळा, २०० आयसीयू खाटांसह ८० कृत्रिम श्वसन यंत्रणा सुविधा, तीन ठिकाणी १००३ प्राणवायूयुक्त खाटांची सुविधा असणारी करोना रुग्णालय तर ऐरोली येथील ३०२ खाटांच्या काळजी केंद्राचा समावेश आहे.

याप्रसंगी ठाणे जिल्ह््याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त बिपिन कुमार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई पालिका प्रशासनाने शून्य मृत्युदर मोहीम हाती घेतली असून यासाठी जास्तीत जास्त अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे ठरविले आहे. यात प्राणवायूयुक्त खाटांसह कृत्रिम श्वसन यंत्रणेत वाढ केली आहे. हे करीत असताना रुग्ण शौचालयात गेल्यानंतर त्याची प्राणवायू पातळी कमी-जास्त होत असल्याने त्रास वाढत आहे. त्यामुळे बहुतांश करोना रुग्णालयांत शौचालयात प्राणवायूची व्यवस्था केली आहे. वाहिनीद्वारे प्राणवायू पुरविण्यात आला असून या ठिकाणी प्राणवायू पुरविणारी संचिकाही ठेवण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हा समाधान देणारा कार्यक्रम असून प्राणवायूयुक्त खाटा उपलब्ध करून देताना अगदी शौचालयातही प्राणवायू मिळेल अशी काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे बाधितांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यासाठी दूरचित्रसंवादाद्वारे संपर्क करण्यात येणार आहे, हे सर्व कौतुकास्पद असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार खाटा तसेच प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे. ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांकरिता याचा वापर होईल याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या.  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्युदर कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका करोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘मिशन ब्रेक दे चेन’ अंतर्गत चाचणी, आयसोलेट, ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब करीत असल्याचे माहिती दिली.

सुविधांचे लोकार्पण

  • २०० आययीयू बेडसह ८० कृत्रिम श्वसन यंत्रणा
  • राधास्वामी सत्संग भवन तुर्भे येथे ४११ प्राणवायूयुक्त खाटा
  • नि र्यातभवन येथे ५१७ प्राणवायूयुक्त खाटा
  • एमजीएम रुग्णालय सानपाडा येथे ७५ प्राणवायूयुक्त खाटा
  • पाटीदार समाजभवन केंद्रात ३०२ खाटा

 

प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्यात यावी. पालिकेने उभारलेल्या उपाययोजना व शासनामार्फत दिलेल्या आरोग्य सुविधा उत्कृष्ट आहेत.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री