पथदिव्यांचे ६७ जीर्ण खांब बदलण्याचा प्रस्ताव

नवी मुंबईमधील अतिशय महत्त्वाचा व देखणा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील धोकादायक स्थितीतील पथदिव्यांचे खांब बदलण्यात येणार आहेत. ६७ खांब बदलण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेत मांडण्यात येणार आहे. पाम बीच मार्गावरील दिव्यांचे खांब जुने झाले असून कोसळण्याच्या बेतात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये १७ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आले होते.

पाम बीच मार्गावरील दिव्यांचे खांब या मार्गाचे सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरण झाल्यापासून एकदाही बदलण्यात आलेले नाहीत. यापैकी अनेक खांब गंजले आहेत. सततच्या अपघातांमुळेही हा मार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा असलेल्या या मार्गावर अचानक पथदिव्याचा खांब कोसळून मोठी दुर्घटना झाल्यास, याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. पालिकेने तात्काळ पथदिवे बदलावेत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत होती.

नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय याच मार्गालगत किल्ले गावठाण चौकाजवळ आहे. याच मार्गावरून हजारो मुंबईला, ठाण्याला ये-जा करतात. शीव-पनवेल महामार्गावर तुर्भे, सानपाडा, नेरुळ, नेरुळ खिंड येथे सातत्याने होणारी वाहतूककोंडी व वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी अनेक जण बेलापूरवरून पामबीच मार्गाने वाशीहून मुंबईकडे जातात. उरण, उलवे नोडमधील नागरिकही याच मार्गाने मुंबईकडे जातात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पथदिव्यांचे खांब भक्कम असणे आवश्यक आहे.

संपूर्ण नवी मुंबई शहरात जवळपास ३० हजार पथदिवे आहेत. त्यातील ४३० पथदिवे पामबीच मार्गावर आहेत. परंतु जुन्या माइल्ड स्टीलच्या पथदिव्यांची दुरवस्था झाली होती. पामबीच परिसरात दमट हवेमुळे खांब गंजण्याचे प्रमाण अधिक आहे. काही पथदिव्यांचे खांब पडून छोटे अपघातही झाले आहेत. या मार्गावरील सुमारे २० खांब कोसळले आहेत. कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी पथदिव्यांचे खांब बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ६ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी शीव-पनवेल महामार्गाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलांखालील भागांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तिथे रोषणाईही केली जाणार आहे; परंतु महासभेत प्रस्ताव संमत करून विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नवीन खांब बसवण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

पामबीच मार्गावरील जुने दीपस्तंभ बदलून नवीन दीपस्तंभ उभारण्याचा प्रस्ताव महासभेत येणार आहे. सुमारे ६७ दीपस्तंभ बदलण्यात येणार असून त्यासाठी ७६ लाख रुपये खर्च होणार आहेत.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

पामबीच मार्गावरील दिव्यांच्या खांबांबद्दल पालिकेशी पत्रव्यवहार केला होता. ‘लोकसत्ता’ने आवाज उठवल्यामुळे पालिका प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महासभेत तो मंजूर झाल्यावर  दीपस्तंभ बदलण्यात येतील.

समीर बागवान, परिवहन सदस्य

फिफा विश्वचषकासाठी जगभरातील प्रेक्षक व खेळाडू नवी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे पामबीच मार्गावरील मोडकळीस आलेले ६७ दीपस्तंभ बदलून नवे लावण्यात येणार आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

मोहन डगावकर, शहर अभियंता