लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : मागील चार वर्षांपासून तांत्रिक अडचणीत अडकलेली ४०८ कोटींची पनवेलच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. या कामाचा कालावधी ३० महिन्यांचा असल्याने पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना ‘अमृत’चे पाणी मिळणार आहे.

पनवेल शहरवासियांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी ४०८ कोटींच्या अमृत पाणी पुरवठा योजना पालिकेने आखली आहे. मात्र प्रत्यक्षात यायोजनेचे काम सुरू होत नव्हते. कधी कंत्राटदाराची पात्रता तर कधी निविदेची क्षमता एवढेच नव्हेतर विविध प्राधिकरण पनवेल व उरणमध्ये कार्यरत असल्याने त्यांचा न मिळणारा निधी..यामुळे पनवेलकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत होते. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सचिवालयात याबद्दल आवाज उचलला होता. पनवेल पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात केलेल्या शिष्ठाईमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या नस्तीला गती मिळाली आहे.  या योजनेमुळे २२८ दश लक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे. यासाठी जेव्हीपीआर या कंपनीची निवड केली असून २४७ कोटी रुपयांची विविध कामे पुढील महिन्यापासून सुरू होतील.

शहराला शंभर एमएलडी

या कामानंतर पनवेल पालिकेला यातील शंभर एमएलडी, एमएमआरडीए क्षेत्राला १९, जेएनपीटी बंदराला ४० तर सिडको वसाहतींना ६९ एमएलडी पाणी मिळणार आहे. १६१ कोटी रुपये एमजेपी पंपींग यंत्रसामुग्री व इतर कामांसाठी खर्च करणार आहे. सध्या एमजेपीने पालिका व इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. प्राधिकरणाचा कार्याध्येश देण्याची कार्यवाही झाल्यानंतर प्रत्यक्षात कंत्राटदार काम करु शकेल. सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये ९६५ व १९५० मीलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा करणार आहे.

दोन वर्षांची प्रतीक्षा

पनवेल पालिका क्षेत्रात पनवेल पालिकेला एमजेपी अवघे ८.५ एमएलडी पाणी पुरवठा करत होती. दोन वर्षांनंतर एमजेपी थेट शंभर एमएलडी पाणी पुरवठा पनवेल पालिकेला करणार आहे. दोन  वर्षांनंतर पनवेल पाण्यामध्ये संपन्न होण्याची चिन्हे आहेत.