एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर भाजपच्या नेत्यांची नजर

पनवेल पालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्व टिकवणारी ठरणार असल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी दुपारपासून रात्री साडेतीनपर्यंत पनवेल ते खारघरदरम्यान विविध शिवसेना शाखांमध्ये खलबतांचे सत्र राबवण्यात आले. मंत्र्यांसोबत असलेल्या वाहनांच्या आणि शिवसैनिकांच्या ताफ्यामुळे ही खबर सर्वत्र पसरली आणि प्रतिस्पर्धी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतील घडामोडींची हेरगिरी सुरू केली.

शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी ठाणे व नवी मुंबईतील निवडणुकीत यशस्वी डावपेच लढवणारे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदेश बांदेकर यांच्यावर पनवेलची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शिंदे रात्रीचा दिवस करून कामाला लागले आहेत.

मंगळवारी त्यांच्यासोबत १२ वाहने, सुमारे ७० कार्यकर्ते, काही पोलीस व दुचाकीवरून फिरणारे शिवसैनिक असा मोठा ताफा पनवेल परिसरात फिरत होता. खारघर व कळंबोली येथील बैठका रात्री पावणेअकरा वाजता उरकल्यावर कामोठे येथे साडेबारा वाजता मंत्र्यांनी शाखेतच फळांचा रस व अल्पोपाहार घेतला. त्यानंतर रात्री पाऊणच्या सुमारास पनवेल शहरातील शाखेत बैठक सुरू झाल्यावर दोन वाजता त्यांनी नवीन पनवेल येथील सैनिकांशी संवाद साधला.

मंत्री रात्रपाळीत कसे काम करतात हे पाहण्यासाठी शिवसैनिक व रहिवाशांनी गर्दी केली होती. मंत्री येणार व काही तरी आश्वासन देऊन जाणार असे सेनेच्या कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र मंत्रीच रात्री तीन वाजता आल्याने अनेकांनी घर गाठले. काही इच्छुक उमेदवार मात्र ताटकळत मंत्र्यांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रत्येक शाखेसमोर ३० हून जास्त कार्यकर्ते होते.

शिवसेनेत एवढय़ा जोरदार घडामोडी का सुरू आहेत, हे जाणून घेण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते हेरगिरी करत होते. एक निळी ऑडी आणि एक फॉच्र्युनर शिवसेनेच्या ताफ्याचा पाठलाग करत होती.

शिवसैनिकांतील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

पनवेल पालिकेची निवडणूक २१ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अल्पावधीत पक्षबांधणी करण्याचे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी रायगडचे जिल्हाप्रमुख व आमदार मनोहर भोईर हे स्वबळाच्या विरोधात आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी काही शहरप्रमुखांना हाताशी धरून युतीसाठी प्रयत्न केल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शिंदे व बांदेकर यांनी सोमवारपासून बैठकांचे मोठे सत्र पनवेलमध्ये खारघर वसाहतीपासून ते कळंबोली, कामोठे, नवीन पनवेलपर्यंत सुरू केल्याचे समजते.

अनेक वर्षे पनवेलचे नेते बबन पाटील यांनी शेकाप व भाजपसोबत युतीचा प्रस्ताव पक्षप्रमुखांसमोर ठेवून शिवसेनेला रायगड जिल्हा परिषदेत व पंचायत समितीच्या सत्तेत वाटेकरी केले; परंतु प्रत्यक्षात त्यामुळे शिवसेना वाढू शकली नाही, असेही मत अनेक शिवसैनिकांनी मांडले.

काही नेते जाणीवपूर्वक भाजपच्या साथीशिवाय शिवसेना निवडून येऊ शकत नाही, असे संदेश मोबाइलवर पसरवत आहेत, तर काही नेते बांदेकर शिवसेना संपविण्याचे काम करत असल्याचे संदेश मोबाइलवर पाठवत असल्याची चर्चा आहे.