12 December 2017

News Flash

प्रशासकीय अनास्थेचे बळी

पनवेल शहरातील या प्रभागात उच्चभ्रूंच्या बंगल्यांपासून ते तीन पिढय़ा एकाच खोलीमध्ये राहणारा वर्ग आहे.

संतोष सावंत, पनवेल | Updated: May 17, 2017 2:45 AM

पाणीटंचाईसोबतच प्रभागात अस्वच्छता आणि विजेची समस्या

पनवेल शहरातील या प्रभागात उच्चभ्रूंच्या बंगल्यांपासून ते तीन पिढय़ा एकाच खोलीमध्ये राहणारा वर्ग आहे. धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपून आपले शहर समजणाऱ्या या मंडळींना वीज, पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने समान नियम ठेवून पिण्यापुरते पाणी, स्वच्छ शहर त्यामध्ये सुटसुटीत रस्ते तसेच अखंडित वीज एवढय़ा मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी माफक अपेक्षा येथील रहिवाशांची आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य व्यक्तींना जगण्यासाठी ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे, अशा सुविधांपासूनदेखील प्रभाग १९ मधील नागरिक वंचित आहेत.

पनवेल शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या बस आगारासमोरील ‘लाइन आळी’ परिसर ते मिडलक्लास हाऊसिंग सोसायटीमधील बंगले, तेथील मैदान, शहरातील विविध बाजारपेठांपासून कल्पतरू सोसायटीपर्यंतचा परिसर याच प्रभागात येतो. याशिवाय अनेक आमदार, माजी खासदार, माजी नगराध्यक्ष, बडे उद्योगपती, विकासक याचे कुटुंबीय याच प्रभागात वास्तव्य करीत असल्यामुळे महापालिकेने पायाभूत सुविधा देताना त्यामध्ये भेदाभेद करू नये, अशी अपेक्षा या प्रभागामधील रहिवाशांकडून व्यक्त केली जाते. मुळातच शहराच्या नियोजनाबाबत प्रशासकीय अनास्थेमुळे या प्रभागात येणाऱ्या कोळीवाडय़ांमधील टपाल नाका येथील घरे नियमांना तिलांजली देऊन उभारण्यात आलेली आहेत. त्यातूनच भिंतीला भिंत लागून उभी असलेली घरे, त्यामुळे परिसरातील नालेसफाईमध्ये येणाऱ्या अडचणी, तुंबलेल्या नाल्यांमुळे उद्भवणारे विविध आजार अशा एक ना अनेक समस्या या प्रभागामध्ये आहेत. शिवाय प्रभागातील पाणी समस्या ही अधिकच क्लिष्ट असल्याने दोन दिवसाआड तासाभरासाठी येणाऱ्या पाण्यामुळे महापालिकेने मुबलक पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा येथील महिलावर्गाची आहे.

ब्रिटिशकालीन वीज व्यवस्थेनुसार खांबांवर टांगलेल्या वीजतारांमुळे पनवेलच्या वीज व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची जाणीव होते. या परिसरात विजेचा खोळंबा वारंवार होतो. त्यामुळे धनिकांच्या बंगल्यांत असणाऱ्या इनव्हर्टरमुळे त्यांना २० तास विजेविना काढता येतात, मात्र श्रीमंतांचा शेजार लाभावा म्हणून घर घेतलेल्या मध्यमवर्गीयांची मात्र वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. गुढीपाडवा, दीपावली अशा विविध सणांवेळीदेखील पनवेलमध्ये वीज नसणे हे नित्याचेच आहे. ही दयनीय अवस्था बदलण्याची मागणी येथील रहिवाशांची आहे. याशिवाय कोळीवाडय़ामध्ये मलनि:सारण वाहिनी व सांडपाण्याचे स्वतंत्र धोरण आखण्याची गरज असून खेटून बांधलेल्या घरांमुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे बंब कुठे उभे करावेत, असा प्रश्न पडतो. या प्रभागात मध्यमवर्गीयांच्या सुनियोजित गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये स्वतंत्र बंगले जरी असले तरी येथील नाले तुंबणे ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेनंतर खऱ्या अर्थाने पनवेल शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होईल, अशी अपेक्षा बाळगणे सयुक्तिक ठरेल.

chart

रस्ते रुंदीकरणाची गरज

बाजारपेठेतील पंचरत्न हॉटेल ते शनी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते यामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे व्यापारीवर्ग धास्तावलेला आहे. त्यामुळे शहरातील रोहिदास वाडा व एमजी रोडवरील अरुंद रस्ते टीडीआर पद्धतीने पालिकेने रूंद करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

प्रभाग ओळख –

कोळीवाडा, लाइन आळी, मिडलक्लास सोसायटी, टपाल नाका परिसर, मार्केट यार्ड असा परिसर या प्रभागात येतो.

First Published on May 17, 2017 2:45 am

Web Title: panvel municipal corporation election 2017 water shortage cleanliness issue