पनवेल शहरातील ठाणे नाका ते नगरपरिषदेपर्यंतच्या मार्गाचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने काँक्रिटीकरण सुरू असल्याने या कामात १७८ वृक्षे तोडली जाणार असल्याची भीती पनवेलमधील निसर्गप्रेमींनी व्यक्त केली होती; मात्र नगरपालिकेने १७८ वृक्षांपैकी ४० वृक्ष न तोडता त्यांचे पुर्नरोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल शहरामधील डांबरीकरणाच्या रस्त्यांच्या वादात कंत्राटदारांचे भले आणि सामान्य पनवेलकरांचे कंबरडे मोडले त्यामुळे शहरातील रस्ते कायम स्वरुपी काँक्रिटचे असावेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्रालयात अनेक बैठका घेतल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहरातील रस्ते कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला मंजूरी दिली. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी महिन्याभरापूर्वीच या कामाचे भूमीपूजन केले. त्याच कामांपैकी ठाणा नाका ते नगरपरिषद हा दिड किलोमीटरचा मार्ग सूमारे १४ कोटी रूपये खर्च करून ९ महिने ते एका वर्षांत येथे बांधकाम करणे अपेक्षित आहे. मात्र पनवेलच्या या विकास कामामध्ये थेट वृक्ष तोड होणार असल्याने शहरातील निसर्गप्रेमी दुखावले आहेत. सावली देणारे अनेक वर्षांची भलीमोठी वृक्षतोड होणार असल्याने नगरपरिषद निसर्गविरोधी असल्याचे मत अनेक पनवेलकरांनी व्यक्त केले. निसर्गप्रेमींनी नगरपरिषदेमधील वृक्ष प्राधिकरण समीती, प्रशासन व सत्तेतील काही मंडळींची भेट घेऊन विकास हवा की निसर्ग याचा पाढाही वाचला. यानंतर वृक्ष प्राधिकरणाच्या संमतीशिवाय ही वृक्षतोड न करण्याचा निर्णय मुख्याधिकारी चितळे यांनी जाहीर केला.
निसर्गप्रेमींच्या हरकती या समितीकडे येणार असल्याने पुनरेपनाचा खर्च संबंधित कंत्राटदार म्हणजेच एमएमआरडीए करणार आहे. ४० वृक्षांची तोड नगरपरिषदेने टाळण्याचे कंत्राटदाराला सूचवून या मार्गातील बांधकामादरम्यान येणाऱ्या ३४ वृक्षांचे पुनरेपन करण्याचा बेत नगरपरिषदेने आखला आहे. सध्या या मार्गाचे रस्त्याकडेच्या पाण्याच्या निचरा होणाऱ्या नाल्याचे काम सूरु आहे. संबंधीत वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरेपनाचे काम कोणत्या कंपनीला द्यावे याचीही माहिती चितळे यांनी निसर्गप्रेमीकडे मागीतली आहे.